जिल्हाधिकाऱयांचे आवाहन : वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी रविवारीही सिंधुदुर्ग जिह्यात उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे निर्मनुष्य झाले होते. मात्र, सोमवारपासून बाजारपेठा उघडल्यानंतर गर्दी न करता निर्बंध पाळावेत आणि कोरोना विरुद्धच्या लढाईत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे
संपूर्ण राज्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केले. पहिल्याच दिवशी शनिवारी जिह्यात कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर रविवारी दुसऱया दिवशी सर्वांनीच घरीच थांबून लॉकडाऊनला प्रतिसाद दिला. त्यामुळे वीकेंडच्या दोन्ही दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावरही बंदोबस्त होता. पोलिसांची गस्तीपथके तैनात होती. त्यामुळे जिल्हय़ात कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेत कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. प्रवासी वाहतूक बंद होती. ऑटो रिक्षाही बंद होत्या. त्यामुळे मुंबई व अन्य ठिकाणाहून रेल्वेने आलेल्या प्रवाशांना पायपीट करत घर गाठावे लागले. जिल्हय़ातील नागरिकांनी कडकडीत बंद पाळून चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सर्वांना धन्यवाद दिले. सोमवारी बाजारपेठा उघडल्या तरी कुणीही गर्दी करू नये. शासनाने 30 एप्रिलपर्यंत नियम लागू केले आहेत. त्यामुळे सर्वांनी निर्बंध पाळावेत आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.









