प्रतिनिधी/ मुंबई
‘कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन’ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचे अल्यसंख्यांक नबाव मलिक यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारपासूनच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आणि हे निर्बंध 30 एप्रिलपर्यंत असतील. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन असेल. उर्वरित पाच दिवस कडक निर्बंध असतील. राज्यात कोणतेही राजकीय कार्यक्रम करण्यासही बंदी असून धार्मिक स्थळांनाही पूर्वीप्रमाणेच नियम लागू असतील. दळणवळणाच्या कोणत्याही सेवा बंद केलेल्या नाहीत व जिल्हा बंदीही नसेल, असे मलिक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तथापि यामधून ठाकरे सरकारने मध्यममार्ग स्वीकारल्याचेही दिसून आले आहे. रविवार असूनही दिवसभर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील विविध घटकांसोबत चर्चासत्र सुरुच राहिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उद्योगजगतासह विरोधी पक्ष आणि विविध पक्षांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले. त्याचबरोबर या महिन्यात सुरु होणार दहावी, बारावी परीक्षांबाबतही दोन दिवसांमध्ये निर्णय अपेक्षित आहे.
रविवार असून बैठकांचा सपाटा
राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाज माध्यमांवरुन जनतेशी संवाद साधला होता. अर्थचक्र सुरु ठेवण्याबरोबरच अनर्थचक्र रोखण्याचे आव्हान असल्याचे सांगून त्यांनी कडक लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्याचबरोबर सर्वांना बरोबर घेऊन, चर्चा करुनच निर्णय घेतले जातील, असेही सांगितले होते. त्यानुसार रविवार सुटी असूनही दिवसभर त्यांनी प्रशासकीय टीम आणि आपल्या मंत्रीमंडळ सहकाऱयांसह मॅरेथॉन बैठकांचा सपाटा लावला. राज्यातील उद्योग जगतानेही त्यांना योग्य प्रतिसाद देत नियमांचे पालन आणि अधिक खबरदारी जबाबदारीने घेण्याचे मान्य केले.
कडक निर्बंधाचा पर्याय सर्वमान्य
मंत्री मंडळ बैठकीमध्ये कडक लॉकडाऊनबाबतही साधकबाधक चर्चा करण्यात आली. मात्र त्याचे विपरित परिणाम अधिक होऊ शकतील, असा निष्कर्ष समोर आल्याने कडक निर्बंध लागू करण्याचे ठरवण्यात आले, असेही मंत्री नबाब मलिक यांनी सांगितले. या कालावधीमध्ये सर्व मॉल, हॉटेल, रेस्टारंट बंद राहणार आहेत. चित्रपटगृह, नाटय़गृहही बंद ठेवली जाणार आहेत. शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. कारखान्यामध्ये कामगारांची निवास व्यवस्था करण्याची सूचना करण्यात आली असून त्यांच्या कुटुंबीयांचीही उद्योजकांनी काळजी घ्यावी, असे निर्देश दिले असून कामगारांवर कोणतेही निर्बंध असणार नाही, असेही ते म्हणाले.
दळणवळण सेवा सुरु राहणार
राज्यात रेल्वेसेवा, बससेवा, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा बंद राहणार नाहीत. त्यांना सशर्त मंजूरी देण्यात आली आहे. एसटी बसमध्ये 50 टक्के उपस्थितीसह सेवा सुरु राहणार आहे. कोणत्याही प्रकारे बससेवा थांबवण्यात आली नसल्याचेही मंत्री मलिक यांनी स्पष्ट केले. खासगी बससेवा देताना कोरोनाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी न झाल्यास त्या बसचालक, कंपन्यांना दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. बसमध्ये कोरोनाकाळात लागू करण्यात आलेली एसओपी आताही अंमलात आणण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योगजगताकडून सर्वतोपरी सहकार्य
तत्पूर्वी रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील उद्योग जगताला ‘हम सब एक है’ या भावनेने प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. याला सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण उद्योग जगत शासन आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही बैठकीत उपस्थित मान्यवर उद्योजकांनी दिली. काही उद्योजकांनी लसीकरणास प्राधान्य देण्यासह वैद्यकीय साहित्य दळणवळणास पूर्ण सहकार्याची भूमिका घेतली. जिंदाल उद्योग समुहाने ऑक्सिजन पुरवठय़ाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. तर कल्याणी उद्योग समुहाने व्हेंटीलेटर्स निर्मिती, वापर आणि त्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या रुग्णालयांनी तयारी दर्शवल्यास त्यांना लसीकरणास परवानगी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे त्याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार, आरोग्य सचिव प्रदीप व्यास, उद्योग सचिव पी. अन्बल्गन तसेच उद्योजक उदय कोटक, अजय पिरामल, बाबा कल्याणी, सज्जन जिंदाल, अशोक हिंदुजा, हर्ष गोयंका, मनदीप मोरे, अपूर्व देशपांडे, जफर खान, सिद्धार्थ जैन आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य सरकारला पाठिंबा- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल, अशी ग्वाही विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसादा देताना दिली आहे. राज्यातील जनतेने याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहनही केले. तथापि राज्य सरकारने आतातरी आरोग्य विषय सुविधा आणि औषधांची सलग उपलब्धता यावर काम करावे. सर्व घटकांसाठी काहीतरी तरतूद करावी, त्यासाठी स्वतंत्र बैठक आणि तज्ञांची मते अजमावावीत, असेही सांगितले.
मनसेचाही प्रतिसाद
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरुन संवाद साधल्यानंतर राज यांनी त्याला प्रतिसाद दिला. मनसेच्या अधिकृत ट्विटरवरुन सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्येने गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लसीकरणाची अट शिथिल करावी- नाना पटोले
जनभावनेचा आदर करून संपूर्ण लॉकडाऊन न लावण्याचा सरकारचा निर्णय योग्य असून नागरिकांनीही प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करून सरकारला सहकार्य करावे असे आवाहन करून पेंद्र सरकारने लसीकरणासाठीची वयाची अट शिथील करून 18 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.








