गब्बर ऍग्रोटेक कंपनीच्या संचालकाला अटक : एकूण 197 शेतकऱयांना गंडा
वार्ताहर / पुणे
शेतकऱयांना कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात होणाऱया आर्थिक फायद्याचे आमिष दाखवून 1 कोटी 73 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार सप्टेंबर 2019 मध्ये उघडकीस येऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात आतापर्यंत एकूण 197 शेतकऱयांची तब्बल 5 कोटी 82 लाख 26 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी गब्बर अŸग्रोटेक कंपनीच्या संचालकाला दत्तवाडी पोलिसांनी बुधवारी अटक करून न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. भळगट-बाफना यांनी त्याला 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मृगेश जयवंत कदम (वय 45, रा. वडगाव शेरी, पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यापूर्वी प्रितम रमेश माने (24, रा. आंबेगाव मूळ रा. यशोधननगर, मु. पो. उरुण इस्लामपूर, ता. वाळवा जि. सांगली), महारयत अŸग्रो इंडिया कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते, संचालक हनुमंत शंकर जगदाळे (रा. अंबक चिंचणी ता. कडेगाव जि. सांगली) यांनाही अटक करण्यात आली होती. हा प्रकार महारयत अŸग्रो इंडिया प्रा. लि.च्या पुणे-सातारा रस्त्यावरील सीटी प्राईड सिनेमा हॉलजवळील लँडमार्क सेंटर इमारतीत कार्यालयात घडला.
आतापर्यंत 197 शेतकऱयांची 5 कोटी 82 लाख 26 हजारांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. कंपनीच्या कार्यालयातून कागदपत्रे, फाईल्स, संगणक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रितम माने आणि महारयत कंपनीची बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाची सुरुवात कापरे अŸग्रो कंपनीपासून झाली. आरोपींनी मिळालेल्या पैशातून इतर 5 कंपन्या स्थापन केल्या. अशाच गब्बर या कंपनीचा मृगेश संचालक होता. या कंपन्यांचे कामकाज महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यामध्ये पसरले आहे. राज्यभरात 10 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुहय़ात 7 कंपन्याचा सहभाग आहे.









