प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर येथील कापूसखेड रोड एमएसईबी जवळील नंदा हंबीरराव साळुखे (४५) या महिलेने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. उपचार घेत असताना त्यांचा रविवारी रात्री १० वाजता मृत्यू झाला. कडकनाथ कोंबडी घोटाळयात पती व मुलाचे पैसे अडकल्याच्या ताणातून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असल्याचा आरोप कडकनाथ संघर्ष समितीचे निमंत्रक दिग्विजय पाटील यांनी केला आहे.
तसेच या महिलेच्या मुलानेही त्यास दुजोरा दिला आहे. या महिलेने राहत्या धरी किटकनाशक प्याल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाली. पती न मुलाने त्यांना तात्काळ सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. पण त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉ. प्रियांका गुरव यांनी पोलीसांना त्यांच्या मृत्यू बाबत माहिती दिली. दरम्यान या महिलेचा मुलगा याने कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात आठ ते दहा लाख रुपये अडकले आहेत.
त्या तणावातूनच आईन जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती कडकनाथ संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांना दिली. समितीचे निमंत्रक पाटील अन्य पदाधिकाऱ्यांनी नंदा साळुखे यांच्या घरी जावून पत्नी व मुलाचे सांत्वन केले.
दरम्यान पाटील यांनी एक व्हिडीओ क्लिप बनवून ती सोशल मिडीयावर व्हायरल केली. त्यामध्ये त्यांनी पोलीस व लोकप्रतिनिधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी यामध्ये म्हटले आहे की, अडीच वर्षापासून कडकनाथ घोटाळयात पाठीमागील व या सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामध्ये राजकारण येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा जीव जात आहे. नऊ लाख रुपये या घोटाळ्यात अडकल्याने या महिलेने आत्महत्या केली. या घोटाळ्यातील मुख्यसुत्रदार मोकाटफिरत आहेत. या गुन्हयाचा तपास अडखळला आहे. याप्रश्नी रस्त्यावर उतरुन असंतोष व्यक्त करू.