वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारी आणि ओपेक देशांनी तेल उत्पादन वाढविण्यासाठी दाखविलेली सकारात्मकता यामुळे कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा कमी होताना दिसत आहेत. मागच्या एक महिन्यामध्ये यांच्या किमती 9 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. मागच्या मार्चमध्ये कच्चे तेल 69 डॉलर प्रति बॅरेलवर होते. जे आता 63 डॉलरपेक्षाही खाली आले आहे. परंतु याचदरम्यान पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतीबाबत कोणताही दिलासा मिळालेला नाही.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने त्याचा पूर्ण फायदा हा ग्राहकांना होणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजे मोदी सरकारच्या मागील सात वर्षात कच्चे तेल 41 टक्क्यांनी स्वस्त झाले असून पेट्रोल 27 आणि डिझेल 43 टक्क्यांनी महागले असल्याची माहिती आहे.
कच्च्या तेलाचे भाव 55 डॉलरपर्यंत घसरणार
केडिया ऍडव्हाइजर्सचे संचालक अजय केडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार देश आणि जगातील कोरोना महामारीचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. यामध्ये पेट्रोल डिझेलची मागणीही घसरणीत राहिली असून ओपेक देशांनी मे महिन्यात तेल उत्पादन वाढविणार असल्याचे म्हटले आहे. यामध्येच कच्चे तेल येणाऱया महिन्यांमध्ये प्रति बॅरेल 55 डॉलरपर्यंत उतरणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.
मे 2020 मधील कच्च्या तेलाचे भाव
मागील वर्षात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या कारणास्तव मे 2020 मध्ये कच्चे तेल 30 डॉलरवर खाली आले होते. तेव्हा पेट्रोल 69.59 रुपये तर डिझेल 62.29 रुपये प्रति लिटर विक्री झाल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोना वाढण्याची भीती असल्याने पुन्हा एकदा चितेंचे ढग निर्माण झाल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.









