निरुपयोगी कचरा उत्पन्नाचे एक साधन बनू शकतो, हे उत्तर प्रदेशातील काही महिला गटांनी दाखवून दिले आहे. भारत सरकारच्या आत्मनिर्भरतेच्या मंत्रामुळे आपल्यालाही प्रेरणा मिळाली, असे या महिला सांगतात. प्लास्टीक तसेच लाकडाच्या कचऱयापासून उपयुक्त आणि शोभेच्या वस्तू बनविण्याचा उद्योग त्यांनी कोरोनाकाळात हाती घेतला. यासंबंधीचे प्रशिक्षण त्यांना त्यापूर्वीच मिळालेले होते. आता या महिला त्यांनी स्वतः केलेल्या प्रयोगानंतर देवाला अर्पण केलेल्या फुलांच्या निर्माल्यापासूनही खतनिर्मिती करीत आहेत.
‘वेस्ट टू वेल्थ’ (टाकाऊतून टिकाऊ) ही मोहीम उत्तर प्रदेश सरकारने चार वर्षापासून सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्याच्या विविध भागांमध्ये प्रशिक्षण केंदे उघडण्यात आली असून तेथे ग्रामीण भागातील महिलांना हे शिक्षण दिले जाते. साई इन्स्टिटय़ूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट, वाराणसीतील वुमेन टेक्नॉलॉजी पार्क, बसनी येथील महिला प्रशिक्षण केंद्र इत्यादी संस्थांमध्ये टाकाऊ पदार्थांपासून उपयुक्त वस्तू बनविण्याचा पंधरा दिवसांचा प्रशिक्षण अभ्यासक्रम शिकविला जातो.
वाया जाणाऱया वस्तूंपासून उदबत्ती, धूप, वनस्पतीजन्य गुलाल इत्यादी वस्तू बनविण्याचे तंत्र महिलांना शिकविले जाते. याचा लाभ अनेक महिलांनी घेतला असून आता त्या या प्रशिक्षणाच्या जोरावर स्वयंपूर्ण झालेल्या आहेत. आपला खर्च निभावण्याबरोबरच कुटुंबाचा काही प्रमाणात आर्थिक भारही त्या सांभाळू शकतात.









