प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील कचरा व्यवस्थापनामध्ये त्रुटी असल्याने स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही. यामुळे कचरा व्यवस्थापनासाठी स्मार्टसिटी योजनेअंतर्गत शहरातील कचराकुंडीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. आता कुंडीत कचरा टाकणाऱयासह कचऱयाची उचल वेळेत न करणाऱया कामगारावर कॅमेऱयाची नजर राहणार आहे.
शहरातील कचऱयाचे व्यवस्थापण करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे. पण महापालिकेने कचऱयाची उचल करण्यासाठी कचरा डेपोपर्यत वाहतूक करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविली आहे. कोटयावधी निधी खर्च करूनही स्वच्छतेचे काम व्यवस्थित होत नाही. घरोघरी, हॉटेल आणि व्यवसायिक आस्थापनामध्ये जावून कचऱयाची उचल केली जात असतानादेखील काही नागरिक कचराकुंडीत कचरा टाकत आहेत. तसेच काही हॉटेल चालक आणि व्यवसायिक कुंडीत कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अशाप्रकारामुळे कचऱयाचे ढिगारे साचत आहेत. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत विविध योजना राबविण्यात येत असून घरोघरी जावून कचऱयाची उचल केली जाते की नाही, यावर नजर ठेवण्यासाठी आरएफआयडी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. तसेच शहरातील कचराकुंडीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असून यंत्रणा लवकरच प्रारंभ होणार आहे. कचराकुंडीत कचरा टाकणाऱयासह कचऱयाची उचल वेळेत झाली का याची माहिती स्मार्टसिटीच्या कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटरला मिळणार आहे. त्यानंतर कमांड ऍन्ड कंट्रोलच्या माध्यमातून महापालिकेला याची माहिती दिली जाणार आहे. तसेच कचऱयाला आग लावण्याचे प्रकार किंवा हॉटेलमधील कचरा टाकला जातो. याची माहिती देखील महापालिकेला उपलब्ध होणार आहे. यामुळे असे गैरकारभार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱयाची मदत होणार आहे.









