प्रतिनिधी / मडगाव :
मडगाव पालिका क्षेत्रात अन्य भागांतून कचरा आणून टाकण्याचे प्रकार वाढले असून खास करून रेल्वे स्थानक ते रावणफोंड येथील उड्डाणपुलाच्या रिंग रोडच्या पट्टय़ात असे प्रकार होत असतात. याची दखल घेऊन रात्रीच्या वेळी पहारा ठेवून पालिकेच्या अधिकाऱयांनी कित्येकांना रंगेहाथ पकडत दंड ठोठावला.
पालिकेचे मुख्याधिकारी अजित पंचवाडकर यांनी सेनिटरी विभागाचे स्वच्छता निरीक्षक विराज आरबेकर, संजय सांगेलकर व अन्य कर्मचाऱयांना घेऊन शुक्रवारपासून सदर मोहीम राबविली. यावेळी स्थानिक नगरसेवक अविनाश शिरोडकर व माजी नगरसेवक दामोदर शिरोडकर हेही उपस्थित होते.
वरील रिंग रोडच्या पट्टय़ात अनेक हॉटेल्स व अन्य आस्थापने असून तेथे मोठय़ा प्रमाणात कचरा तयार होतो. तो तेथील रस्त्यांच्या कडेला टाकण्यात येत असल्याने सर्वत्र कचरा विखुरलेला आढळून येत असतो. त्यामुळे या भागाला मिनी सोनसडा असेही संबोधले जाते. मुख्याधिकारी पंचवाडकर यांनी याची दखल घेऊन रात्रीच्या वेळी कचरा फेकणाऱयांवर पहारा ठेवून कारवाई करण्याचे ठरविले व शुक्रवारपासून मोहीम हाती घेतली. मागील दोन दिवसांत दुचाकी व चारचाकी वाहनांतून कचरा फेकणाऱयांवर कारवाई करताना त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
शुक्रवारी सुमारे अडीच हजार व शनिवारी चार हजार रुपये असे मिळून एकूण सुमारे साडेसहा हजार रुपये दंडाच्या स्वरूपात गोळा केले गेले. शुक्रवारी या मोहिमेला पोलीस संरक्षण लाभले होते, मात्र शनिवारी पोलिसांनी उपस्थिती लावली नसल्याचे सांगण्यात आले.
रिक्षाचालकाने ठोकली धूम
शनिवारी एक रिक्षा कचरा भरून तो टाकण्यासाठी आली असता पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांनी त्यांना अडविले. यावेळी या रिक्षाची चावी काढून घेण्यात आली. पण सदर निरीक्षक अन्य एकाला दंडाची पावती लिहून देत असताना सदर रिक्षाचालकाने रिक्षा चालू केली व धूम ठोकली. चावी काढून घेतलेली असताना रिक्षा चालू करून पळ काढला गेल्याने पालिकेच्या अधिकारी आश्चर्यचकित झाले. सदर रिक्षाचालकाने दुसरी चावी वापरून पळ काढला असावा. मात्र या रिक्षाचे छायाचित्र काढलेले असून त्यात रिक्षाचा क्रमांक स्पष्ट दिसतो. त्याच्या आधारे या रिक्षाचा शोध घेऊन कारवाई केली जाणार असल्याची माहिती स्वच्छता निरीक्षक सांगेलकर यांनी दिली.
दरम्यान, पालिकेने दंड ठोठावलेल्या एकाने दंडाची रक्कम फेडण्यास पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याची दुचाकी ताब्यात घेण्यात आली असून दंड भरून ती परत न्यावी असे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.









