प्रतिनिधी/ पणजी
ओल्ड गोवा बायंगिणी येथील नियोजित कचरा प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार मोर्चा काढत कोणत्याही परिस्थितीत सदर प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा दिला.
आमदार पांडुरंग मडकईकर यांनी स्वतः या मोर्चात सहभागी होत प्रकल्पास विरोध दर्शविला व आपण जनतेसोबत असल्याचे स्पष्ट केले. कचरा खात्याचे मंत्री मायकल लोबो हे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही श्री. मडकईकर यांनी केला.
पोरणे गोंय नागरिक मंचातर्फे या प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. ओल्ड गोवा येथील गांधी पुतळ्यापासून हा मोर्चा प्रारंभ होऊन पुन्हा तेथेच विसर्जित झाला. त्यावेळ झालेल्या सभेत आमदार मडकईकर यांच्यासह अनेक वक्त्यांची भाषणे झाली. त्यानंतर तेथील एक मंदिर व कपेलासमोर वाती पेटवून गाऱहाणे घालण्यात आले. शाळा, मठ, हॉस्पिटल, घरे, रहिवासी कॉलनी, बंगले, अशा ठिकाणी कचरा प्रकल्प नको, अशी मागणी यावेळी करण्यात आली.









