प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कचऱयाची समस्या गंभीर बनत चालल्यामुळे काही व्यक्तींकडून ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. अशीच स्वच्छता मोहीम व्हॅक्सीन डेपो मैदानात राबविण्यात आली. येथील मैदानाची स्वच्छता झाली खरी मात्र या ठिकाणी गोळा करण्यात आलेला कचरा उचलण्याकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे .
व्हॅक्सीन डेपो मैदानात गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी कचरा साचल्यामुळे क्रीडापटूंना सराव करण्यास समस्या निर्माण झाली होती. याची दखल घेऊन काही व्यक्तींनी व्हॅक्सीन डेपो मैदानाची स्वच्छता केली. मात्र याठिकाणी गोळा करण्यात आलेल्या कचऱयाच्या पिशव्या अद्यापही एका जागी असल्याचे पाहायला मिळत आहे. मनपाची घंटागाडी या ठिकाणी दररोज कचरा उचलण्यासाठी येते. मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी येथील कचऱयाच्या पिशव्यांची उचल न केल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









