वितरण सोहळय़ाकडे साऱयांचे लक्ष : आमदारांनी पुढाकार घेणे गरजेचे
प्रतिनिधी /बेळगाव
राज्य सरकारकडून अनेक ग्राम पंचायतींना कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र सरकारकडून आलेल्या या वाहनांचे आमदारांकडून वितरण होणार असल्याने अनेकांची मोठी गोची झाली आहे. परिणामी सरकारकडून देण्यात येणारी वाहने वितरण करण्याकडे आता साफ दुर्लक्ष झाले आहे. वाहन वितरणासाठी आमदार आले नाहीत म्हणून तालुका पंचायतमधून ग्राम पंचायतींना वाहन वितरण केले जात नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे अनेक ग्राम पंचायतींमधून संताप व्यक्त करण्यात येत असून वाहनांचे वितरण कधी होणार? याकडेच साऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सरकारकडून ग्राम पंचायतींना कचरावाहू वाहने मंजूर झाली आहेत. मात्र त्यांचा वितरण सोहळा अद्यापही झाला नाही. परिणामी हा सोहळा करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. मात्र आमदारांनी आपण आल्याशिवाय वाहन वितरण करायचे नाही, असे सांगितल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला. मागील आठवडय़ात वाहन वितरण सोहळा होणार म्हणून तालुका पंचायतसमोर ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व पीडीओंनी भाऊगर्दी केली होती. मात्र आमदारांनी तारीख पुढे ढकलल्याने त्यांना पुन्हा रिकाम्या हाती माघारी परतावे लागले.
तालुक्मयातील कचरा निर्मूलनासाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी छोटेखानी कचराडेपो उभारण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तर काही ठिकाणी कचरा विघटनासाठीही ग्राम पंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. नुकताच तालुका पंचायत व ग्राम पंचायतीच्या माध्यमातून कचरा उचल करण्यासाठी कुटुंबाला एक बकेट देण्यात आले आहे. त्यापाठोपाठ आता कचरा उचलण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात असली तरी त्याचा वितरण सोहळा अद्यापही झाला नाही. त्यामुळे ग्राम पंचायत सदस्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
आगळावेगळय़ा फंडय़ाची चर्चा
ग्राम पंचायतींना वाहने देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. यासाठी तालुक्यातील पंचायतमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व अधिकारी तालुका पंचायतकडे दाखल झाले होते. अनेकांनी तर वाहनांची पूजाही केली. मात्र आमदार न आल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. घरोघरी जाऊन कचरा उचल करण्यासाठी 40 ग्राम पंचायतींना वाहने मिळणार आहेत. मात्र त्या-त्या कार्यक्षेत्रातील आमदारांनी हिरवाकंदील दिल्यानंतच ही वाहने ग्राम पंचायतींकडे सुपूर्द करा, असा आदेश अधिकाऱयांना मिळाला. त्यामुळे तालुका पंचायत कार्यालयासमोर वाहनांची गर्दी झाली आहे. आमदारांनी आपल्याच हस्ते वितरण करून आगामी विधानसभा निवडणुकीत मत मिळविण्याचा आगळावेगळा फंडा केल्याची चर्चा सध्या जोरदारपणे सुरू आहे.
आमदारांनीच वाहने वितरण करण्यामागचे गौडबंगाल काय?
बेळगाव तालुका पंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण 57 ग्राम पंचायती आहेत. यापैकी आता 40 ग्राम पंचायतींना वाहने देण्यात येणार आहेत. उर्वरित 17 ग्राम पंचायतींनाही वाहने उपलब्ध व्हावीत, यासाठी जिल्हा पंचायतीकडे विनंती अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे आता उर्वरित ग्राम पंचायतींनाही तातडीने कचरा उचल वाहनांची व्यवस्था होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र वितरणसोहळा होत नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान गावच्या विकासासाठीच ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली असताना ती देण्यास का टाळाटाळ केली जात आहे किंवा आमदारांनीच ती वाहने वितरण करण्याचे गौडबंगाल काय? असा सवालही उपस्थित केला जात आहे. तेव्हा तातडीने संबंधित ग्राम पंचायतींना वाहनांचे वितरण करावे, अशी मागणी होत आहे.









