प्रतिनिधी/ बेळगाव
कगदाळ (ता. सौंदत्ती) येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी सायंकाळी राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. त्या 20 वषीय महिलेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
रुग्ण क्रमांक 9732 ही 20 वषीय महिला महाराष्ट्रातून बेळगावला परतली होती. तिला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण बांधितांची संख्या 306 वर पोहोचली आहे. मात्र जिल्हय़ात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही मोठी आहे.
बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त झालेल्या 8 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. यामध्ये हुक्केरी तालुक्मयातील 4, निपाणी येथील 2, बेळगाव, चिकोडी तालुक्मयातील प्रत्येकी 1 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 292 वर पोहोचली आहे.
सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात 21 बाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्हय़ातील 22 हजार 55 जणांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. तर 7 हजार 78 जणांना 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
आतापर्यंत 20 हजार 794 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 17 हजार 971 अहवाल निगेटिव्ह तर 306 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. क्वारंटाईनमधील चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तपासण्याही वाढविल्या आहेत.
977 अहवाल निगेटिव्ह
गेल्या 24 तासात जिल्हय़ातील 977 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्हा सर्व्हेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी 2 हजार 981 स्वॅब तपासणी अहवाल यायचे होते. बुधवारी ही संख्या 2004 वर पोहोचली आहे. यावरून 977 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे आढळून आले आहे. जिल्हा प्रशासनाला आणखी 2004 अहवालांची प्रतीक्षा आहे.









