“या कोरोनानं कंबरडं मोडलं,’’ समोरची डॉलर जिलबी चमचाभर रबडी मटकावून हरिदास म्हणाला. कोजागरीची रात्र होती. आमच्याच घरी जेवणाचा कार्यक्रम होता. कलियुगातला बकासुर ऊर्फ हरिदाससाठी तुपातली दाल-बाटी, रबडी आणि जिलबीचा बेत केला होता. त्याची बायको, माझी बायको आणि मी दडपे पोहे खात होतो. आमच्या तिघांसाठी मसाला दूध ठरवलं होतं.
“कोणाचं कंबरडं मोडलं? तुझं तर काही मोडलेलं दिसत नाही,’’ त्याच्या तुंदिलतनू देहाकडे दयार्द नजरेने बघत मी उद्गारलो, “का रे बाबा? कोरोनामुळे जगभर करोडो लोकांचे रोजगार गेले. पण तू त्या करोडोतला नव्हेस. तुझी पेन्शन व्यवस्थित चालू होती, आहे. तुला घराबाहेर पडता आलं नाही. हॉटेल्स बंद होती. त्यामुळे तुझे हॉटेलिंगचे बरेच पैसे वाचले असतील. हॉटेलिंग, मल्टीप्लेक्स चित्रपटगृहे, अवाजवी शॉपिंग, फालतू पर्यटने, बारसारख्या जागा बंद असल्याने ज्यांच्या पेन्शनी, पगार सुरक्षित होते त्यांचं या काळात भरपूर सेव्हिंग झालं असेल.’’
“मला सांग, तू गेल्या सहा महिन्यात बँकेत एखादं नवीन फिक्स डिपॉझीट उघडलंस का?’’
“नाही रे. उलट दोन तीन महिने पूर्ण कर्फ्यू राहील, या भीतीने मी गळय़ातली आठ ग्रॅमची चेन मोडली. सव्वीस हजार रुपये आले. चार महिन्यांचा किराणा माल, तेल, तूप, दिवाळीच्या फराळाचं सामान वगैरे खरेदी केलं. चेन मोडली आणि पुढच्या आठवडय़ात सोन्याचा भाव वाढत गेला.’’
“चार महिन्यांचं सामान भरलंस. मग पेन्शनचे पैसे वाचले असतील’’
“डोंबल. ऑक्सिजन आणि ग्लुकोज मोजणारी उपकरणं, व्हिटामिनच्या गोळय़ा, नवे-नवे काढे, सॅनिटायझरच्या बाटल्या, महागडे मास्क, इम्युनिटी वाढवणारी तथाकथित औषधं, साबण… काही विचारू नकोस. कोरोनाच्या भीतीने बायकोने दोन नव्या आरोग्य विम्याच्या पॉलिसी काढल्या. किराणा भरला. पण रोज लागणाऱया किरकोळ वस्तूंचे भाव वाढले होते. पोळय़ा करणारी सखू आणि धुणी भांडी करणारी मावशीने सहा महिन्यांचे पगार घेतले. पण त्या कामावर येऊ शकल्या नाहीत. ती कामं करून जीव अगदी रडकुंडीला आला.’’ “हो ना? मग ज्याचं उत्पन थांबलं असेल आणि घरात कोरोनाचा रुग्ण निघाला असेल त्यांचं काय झालं असेल? आणि आपण… जगातले सगळेच जण लुटले गेलो असू, तर मग हे पैसे कुठे गेले असतील?’’
“राजकारणी आणि व्यापारी वर्गाशिवाय तुला कोणावर संशय येतो?’’
“काही सांगता येत नाही.’’








