प्रतिनिधी/ सातारा
सातारा येथील जय माता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या तीन संचालकांनी 19 कोटी 39 लाख 59 हजार 293 रुपयांची शासकीय कराची रक्कम शासकीय तिजोरीत न भरल्याने त्यांच्याविरोधात राज्यकर उपायुक्तांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर वानवडी, पुणे येथील जिंदाल कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
राज्यकर उपायुक्त साई तुषार वाघचौरे (वय 43, रा. चंद्रभागा गार्डन, शाहूनगर, सातारा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, कोडोली (ता. सातारा) येथील औद्योगिक वसाहत परिसरात जय माता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी कार्यरत आहे. या कंपनीचे संचालक म्हणून ज्योती अशोक जिंदाल, रोहित अशोक जिंदाल आणि अशोक सवरलाल जिंदाल (सर्व रा. लव्हेंडर विंग, रहेजा गार्डन, वानवडी, पुणे) हे कामकाज पाहतात.
या संचालकांनी 2013-14 ते 2016-17 या कालावधीतील विक्रीकर थकबाकी रुपये 19 कोटी 39 लाख 59 हजार 293 एवढी आहे. त्यांना वेळोवेळी सांगून नोटीस पाठवून ते शासकीय कराची थकबाकी शासनाच्या तिजोरीत भरत नसल्याने शासनाची मोठी हानी झाली आहे. तक्रार दाखल होताच पोलिसांनी महाराष्ट्र मूल्यवर्धित कर 2002 कलम 74 (2) नुसार जिंदाल कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अद्याप जिंदाल कुटुंबियातील कोणालाही अटक करण्यात आली नाही.








