बनावट ओळखीसह राहत होता भारताचा शत्रू
वृत्तसंस्था / कराची
1999 मध्ये आयसी-814 विमानाचे अपहरण करणाऱयांमध्ये सामील जहूर मिस्त्राr उर्फ जाहिदर अखुंदची 1 मार्च रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये हत्या झाली आहे. जहूर मिस्त्राr हा डिसेंबर 1999 मध्ये कंधार विमान अपहरणाच्या 5 अपहरणकर्त्यांपैकी एक होता.
मिस्त्राr अनेक वर्षांपासून बनावट ओळख धारण करत कराचीत राहत होता. कराचीच्या अख्तर कॉलनीत तो फर्निचरचे काम करायचा. अनेक दहशतवाद्यांनी त्याच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला होता असे समोर आले आहे.
इंडियन एअरलाइन्सचे विमान आयसी-814 चे 24 डिसेंबर 1999 रोजी नेपाळची राजधानी काठमांडूमधून दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. हे विमान काठमांडूहून दिल्लीत येणार होते, परंतु दहशतवाद्यांनी ते अफगाणिस्तानातील कंधार येथे नेले होते. त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानची राजवट होती. कंधारमध्ये विमान उतरण्यापूर्वी अमृतसर, लाहौर आणि दुबईत देखील पोहोचले होते.
आठवडाभराहून अधिक काळ चाललेल्या ओलीसनाटय़ात भारताला मसूद अझहर, अहमद ओमर सईद शेख आणि मुश्ताक अहमद जरगर या दहशतवाद्यांची मुक्तता करावी लागली होती. या पूर्ण घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता.









