थकीत मानधन त्वरीत देण्यासाठी अधिष्ठात्यांकडे मागणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर्सना मुदत संपल्याने थांबवले आहे. पण त्यांना थकीत मानधन मिळाले नाही. त्यामुळे थकीत मानधन मिळावे, सेवेत पुर्ववत सामावून घ्यावे, या मागणीसाठी कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर्संनी सीपीआर हॉस्पिटलमधील अधिष्ठाता कार्यालयासमोर मोर्चा काढून धरणे आंदोलन केले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी आठ दिवसांत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात कंत्राटी कर्मचारी घेतले होते. त्यांना मुदत संपताच, निविदा संपताच कमी करण्यात आले आहे. पण त्यांना थकीत वेतन मिळालेले नाही. थकीत वेतन मिळावे, सेवेत सामावून घ्यावे, यासाठी रिपब्लिकन एकतावादी पक्षाच्या नेतृत्वाखाली या कंत्राटी कर्मचाऱयांनी सीपीआरमध्ये सोमवारी धरणे धरले. निवेदनात थकीत मानधन त्वरीत मिळावे, आदेशानुसार कोरोना काळात काम केल्याने पुर्ववत कामावर घ्या, आदी मागण्या केल्या आहेत.
आंदोलनात हिवताप कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष बाजीराव कांबळे, शिवाजी हिरवडेकर, अविनाश कांबळे, अजित कदम, सागर शिंदे, सौरभ सुतार, श्रीधर निळकंठ, राजाराम कांबळे, सिकंदर मुजावर, संभाजी पाटील, शहाजी जठार, प्रशांत भुर्के, श्रीकांत कांबळे आदी सहभागी झाले होते. प्रभारी अधिष्ठाता डॉ. लोकरे यांनी निवेदन स्वीकारून आठ दिवसांत कार्यवाही करू, अशी ग्वाही दिली.
`म्युकर’वरील कामगिरीसाठी अधिष्ठाता डॉ. लोकरे यांचा सत्कार
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कान, नाक, घसा विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी म्युकर मायकोसीस रूग्णांवर चांगले उपचार पेले, रूग्णांचे जीव वाचवले, या कामगिरीसाठी सीपीआरमधील कंत्राटी कर्मचारी, हिवताप, कर्मचारी संघटनेच्यावतीने राज्य अध्यक्ष बाजीराव कांबळे यांच्या हस्ते प्रभारी अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांचा सत्कार करण्यात आला.









