स्वयंदिप्त पाल चौधरी यांचा आणखी एक कारनामा
प्रतिनिधी / पणजी
ईमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रा. लि. या संस्थेने पणजीत भुयारी वीजवाहिन्या टाकण्यासाटी कंत्राट दिले होते, त्या कंत्राटदाराला 2.17 कोटी रुपये आगावू दिल्याचे उघड झाले असून त्यासाठी स्मार्ट सिटीचे अधिकारी स्वयंदिप्त पाल चौधरी यांनी गोवा सरकारची मान्यता देखील घेतली नसल्याचे उघडकीस आले आहे.
पणजीतील वीज खांबांवरील तारा कमी करून त्याऐवजी भुयारी वीजवाहिन्या टाकण्याकरीता पणजी ईमॅजिन स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटतर्फे काम हाती घेण्यात आले.
शलाका इन्फ्राटेकला अगोदरच दिले पैसे
या कामाचे कंत्राट मेसर्स शलाका इन्फ्राटेक प्रा. लि. या कंपनीला 17 डिसेंबर 2013 रोजी 73.75 कोटी रुपयांना देण्यात आले होते. हे काम जानेवारी 2020 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक होते. त्यानंतर या कामाची पाहणी गोवा वीज खाते आणि स्मार्ट सिटीतर्फे संयुक्तपणे करण्यात आली. तथापि कंत्राटदाराला संपूर्ण रक्कम काम संपण्याआधीच देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र यातील बरेचसे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या संपूर्ण योजनेसाठी केलेल्या खर्चाची तपासणी करून लेखा अधिकाऱयांनी स्मार्ट सिटीच्या एकंदरीत कारभारावर ताशेरे ओढलेले आहेत.
कंत्राटदाराला नियमांचे उल्लंघन करुन पैसे, जीएसटी दिला
संबंधित कंत्राटदाराला कामाच्या पहिल्या टप्प्यात मूळ रकमेच्या तुलनेत 2.17 कोटी रुपये आगावू देण्यात आले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम लेखा नियमानुसार एकाद्या कंत्राटदाराला काम देताना त्याच्या कामाच्या एकंदरित केवळ 10 टक्केच रक्कम आगावू देता येते. हे देखील एका विशिष्ट कारणासाठीच, तथापि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनी तिथे नियमाचे उल्लंघन केल्याचे दिसून आले व कंत्राटदाराला 20 टक्के रक्कम शिवाय त्यावर 18 टक्के जीएसटी देण्यात आले. या संपूर्ण रकमेवरील एकूण व्याज पाहता ते 12.77 लाख रुपये एवढे होते.
बँक हमीही काम पूर्ण होण्याअगोदरच केली परत
या कंत्राटदाराने स्मार्ट सिटीअंतर्गत घेतलेल्या कामाच्या मोबदल्यात दोन कोटी रुपये बँक गॅरेंटी देणे आवश्यक होते. कंत्राटदाराने स्मार्ट सिटीला बँक गॅरेंटी दिली होती. मात्र ती देखील कंत्राटदाराचे काम पूर्ण होण्याअगोदराच परत करण्यात आली. कंत्राटदाराबरोबर केलेल्या करारामध्ये अशा नियमाची तरतूद नव्हती. यामुळे एकंदरीत स्मार्ट सिटीच्या कारभाराबबात अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. स्मार्ट सिटीला यामुळे झालेले आर्थिक नुकसान कोणी द्यायचे असा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे.









