पोलिसांना बोलावून थांबविले काम, शेतकरी-प्लॉट व्यावसायिकांमध्ये जोरदार बाचाबाची
वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ते शाहुनगर 60 फूट रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या प्लॉट व्यावसायिकांकडून परत गटारीचे बांधकाम केले. यामुळे शेतकरीवर्गाने रास्तारोको करून आंदोलन केले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी काम थांबविण्याचे आवाहन केले. मात्र काम थांबविण्यात आले नाही. त्यामुळे काकती पोलिसांना बोलावून काम थांबविण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांमध्ये आणि प्लॉट व्यावसायिकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी शेतकऱ्यांना आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी शांततेचे आवाहन केले.
कंग्राळी बुद्रुक गावचा विस्तार वाढत चालला आहे. वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सध्या असलेला हा रोड 60 फुटाचा करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे दोन्ही बाजूची 30-30 फूट अशी जागा घेण्याचे ठरविण्यात आले. शेतकऱ्यांनी विनामोबदला आपल्या जागा देण्याचे मान्य केले. मात्र व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे पुन्हा समस्या निर्माण झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
आम्ही बुडाकडूनच घेतली परवानगी
आम्ही बुडाच्या नियमानुसारच प्लॉट पाडत आहे. कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नाही. मात्र काही लोकांनी आम्हाला नाहक त्रास देऊन आमचे कामबंद पाडले आहे. बुडाच्या आदेशानुसार तसेच सीडीपीनुसार रस्त्याला जागा सोडण्यात आल्याचे कंग्राळी बुद्रुक येथील जागा मालक व जमिनीची जीपी घेतलेले मल्लाप्पा तवनाप्पा पाटील यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे आणि आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना सांगितले.









