वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कोरोना संसर्ग रोगाचे भान ठेवून कंग्राळी बुद्रुक, गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर परिसरामध्ये घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
दोन दिवसांपासून पावसाने चांगली उघडीप दिल्यामुळे सार्वजनिक विहीर, मार्कंडेय नदी, काकती तलाव, किगदी तलाव आदी ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन केल्या.
गौंडवाड भरम तलावामध्ये विसर्जन
गौंडवाड येथील भरम तलावामध्ये गौंडवाड व यमनापूर परिसरातील गणेश भक्तांनी घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
कडोली, गुंजेनहट्टी, येथील श्री मूर्तींचे विसर्जन परिसरातील नाला, तलाव आदी ठिकाणी करण्यात आल्या. कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीच्या पुलावर भक्तांची मोठी गर्दी होती.
अलतगा परिसर
पारंपरिक वाद्यांना फाटा देऊन कोरोना सावटाचे भान ठेवून अलतगा, जाफरवाडी परिसरातील नागरिकांनी मार्कंडेय नदीमध्ये घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे साधेपणे विसर्जन केले. काठोकाठ तुडुंब भरल्यामुळे अलतगा किर्यात भागातील गणेशभक्तांना विसर्जन करणे सोयीचे झाले आहे.
विद्युत लाईटची सोय
अलतगा किर्यात भागातील नागरिकांना रात्री प्रकाशाच्या उजेडामध्ये गणेश मूर्ती विसर्जन करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने कंग्राळी खुर्द ग्राम पंचायतीने विद्युत प्रकाशाची सोय केल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नदी पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे सर्वांना सावधगिरी बाळगून विसर्जन करण्याचे आवाहन केले होते.
उचगाव परिसर
उचगाव
उचगाव परिसरात साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आले. गावाशेजारील गणेश मार्कंडेय नदी काठावरील मार्कंडेय तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन केले.
कल्लेहोळ, उचगाव, तुरमुरी, बाची, सुळगा या भागातील भक्तांनी गणेश मार्कंडेय तिर्थक्षेत्रावर घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
सामाजिक अंतर, मास्कचा वापर कार्यकर्त्यांनी केला होता. उचगाव येथे असलेल्या भव्य तलावामध्ये गावातील 7 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले. ग्राम पंचायतीतर्फे गणेश विसर्जनाची विशेष सोय केली होती.
येळ्ळूर, यरमाळ, अवचारहट्टी, देवगनहट्टी, मास्कगोंडहट्टीतील भक्तांनी अरवाळी धरणात गणपतींचे विसर्जन केले. येळ्ळूरच्या लक्ष्मी तलावात घरगुती श्रीमूर्ती विसर्जन करण्यात येत होत्या. राजहंसगड, नंदिहळ्ळी, बस्तवाड, हलगा, तारिहाळ परिसरातही भक्तिभावाने बाप्पांना निरोप दिला.









