वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
मुंबईहून कंग्राळी बुद्रुक येथे आलेल्या तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे दुपारी चार वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयाकडे नेण्यात आले. कंग्राळी बुद्रुक गावामध्ये या घटनेने भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये 63 व 30 अशा दोन महिला आणि एका 35 वषीय पुरुषाचा समावेश आहे.
कंग्राळी बुद्रुक गावचेच हे सर्व रहिवासी व्यवसायानिमित्त बऱयाच वर्षांपासून मुंबईला राहतात. महिन्यापूर्वी हे कुटुंब आपल्या मूळगावी आले. गावी आल्यानंतर त्यांना 14 दिवस त्यांच्या स्वतःच्या घरी होम क्वारंटाईन करण्यात आले होते. चौदा दिवसांनंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे ते सर्वजण अनगोळ येथील आपल्या फ्लॅटमध्ये रहावयास गेले होते. ते शुक्रवारी रात्री 12 वाजता परत कंग्राळी येथे आले होते. दुसऱयांदा चाचणीमध्ये या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना त्वरित शनिवारी दुपारी चार वाजता जिल्हा रुग्णालयामध्ये शासकीय वाहनातून नेण्यात आले.
संताजी गल्ली परिसर सीलडाऊन
सदर कुटुंबीयांचे घर संताजी गल्ली परिसरामध्ये असल्यामुळे त्यांच्या घरापासून जवळजवळ दीडशे मीटरपर्यंतचा परिसर सीलडाऊन करण्यात आला आहे. तसेच सदर परिसरामधील कोणी नागरिक त्यांच्या संपर्कात आले आहेत की नाही, याचा सर्वे तसेच अनगोळ येथेही कुणाच्या संपर्कात आले आहेत, त्यांचा सर्वे उद्या करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. परिसर सीलडाउन करण्यासाठी
ग्रामपंचायत अध्यक्ष दत्ता पाटील, पीडीओ, तलाठी सहाय्यक बाळू पाटील तसेच कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.









