वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
मसणाई देवीची यात्रा कोरोनाच्या सावटाखाली साधेपणाने साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी गावचे प्रमुख गावडे कै. बसवंत पाटील यांच्या घरातून देवीचा मुखवटा सवाद्य मिरवणुकीने यात्रास्थळी आणण्यात आला. यावेळी देवीची विधिवत पूजा करण्यात आली. यावर्षी हक्कदार फरशीगौडा घराण्यातील शिल्पा कल्लाप्पा पाटील आणि रेणुका शंकर पाटील यांच्या हस्ते देवीची ओटी भरण्यात आली. त्यानंर गाऱहाणा घालण्यात आला. गावच्या महिलांचा दिवसभर ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला.

मंगळवारी सायंकाळी पुन्हा गाऱहाणा घालण्यात आला. त्यानंतर गावातील भाविकांनी देवीला नवस अर्पण केला. बुधवारी सकाळी 10 वाजता देवीला पुन्हा गाऱहाणा घालण्यात आला. त्यानंतर देवीचे भाविकांनी सुरक्षित अंतर ठेवत दर्शन घेतले. दोन दिवस ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. बुधवारी उपस्थित गावडे घराण्यातील लोकांनी महाप्रसादाचे वाटप केले. मंदिर परिसरासह सर्वच ठिकाणी एपीएमसी पोलीस स्थानकाचे अधिकारी लक्ष ठेवून होते.
शिवाय दरवर्षी होणाऱया स्पर्धा कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच खेळण्यांची व इतर दुकाने लावण्यास बंदी घातली होती. यात्रा यशस्वी करण्यासाठी रामलिंग पाटील, शंकर पाटील, कल्लाप्पा पाटील, नरेश पाटील, गुरुनाथ पाटील, परशराम पाटील, विनोद पाटील, भावकाण्णा पाटील, यांच्यासह लता पाटील, किरण पाटील, सरिता पाटील, नूतन पाटील, कल्पना पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.









