न्यायाधीशांच्या निवासांवर 100 कोटी रुपये खर्च होणार
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
आर्थिक संकटाचा सामना करणाऱया पाकिस्तानचा त्रास संपण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 11.17 रुपयांनी घसरला. अर्थातच पाकिस्तानला आता कोणतीही वस्तू आयात करण्यासाठी 266 रुपये प्रतिडॉलर मोजावे लागतील. याचदरम्यान, पाकिस्तानच्या खासदारांना मिळणाऱया निधीत 30 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच 100 कोटी रुपये केवळ पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवासस्थाने आणि विश्रामगृहांच्या देखभालीसाठी देण्यात आले आहेत. आर्थिक समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पाकिस्तानी खासदारांना विकास निधी म्हणून 90 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय ईसीसीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अर्थमंत्री इशाक दार यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली. गर्भधारणा चाचणीत वापरल्या जाणाऱया औषधांच्या किमतीत 25 टक्के वाढ करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. दुसरीकडे, इतर 54 औषधांच्या किमती निश्चित करण्याचा निर्णय बैठकीत पुढे ढकलण्यात आला. दुसरीकडे, पाकिस्तानमधील कोरंगी असोसिएशन ऑफ टेड अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष तेथे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 300 रुपयांपर्यंत वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. सध्या पाकिस्तानमध्ये पेट्रोल 214 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.









