ऑनलाईन टीम / मुंबई :
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मुंबई पोलीस, मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगना ने आणखी एक ट्विट केले आहे.
कृषी विधेयकाच्या मुद्द्यावरून केंद्रातील सरकार विरुद्ध शेतकरी असे चित्र गडद होत आहे. यासाठीच्या आंदोलनांनाही गंभीर वळण प्राप्त होऊ लागले आहे, असे असतानाच कंगनाने या आंदोलकांची तुलना दहशतवाद्यांशी करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा आधार घेत कंगनाने तिची भूमिका स्पष्ट केली.

कंगना आपल्या ट्विट मध्ये म्हणाली की, जे झोपलेले आहेत त्यांना जागे करता येईल, ज्यांचा गैरसमज झाला आहे त्यांची समजूत काढता येईल पण जे झोपेचे सोंग करत आहेत, काहीच समजत नाही असा आव आणत आहेत, त्यांना तुम्ही कितीही समजावून सांगितले तरी काही फरक पडणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच हे तेच दहशतवादी आहेत, ज्यांनी सीएए ला विरोध केला. सीएए विरुद्ध आंदोलन करून रक्ताचे पाट वाहिले होते, प्रत्यक्षात मात्र एकाही व्यक्तीचा नागरिकत्व या कायद्याने हिरावले गेले नाही, असे म्हटले आहे.
कृषी विधेयकानंतर मोदींनी शेतकऱ्यांना उद्देशून एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी आपलं सकरार हे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर असल्याची बाब स्पष्ट केली. ‘मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आता पुन्हा सांगत आहे. एमएसपीची व्यवस्था यापुढेही सुरु राहिल. शेतमालाची खरेदी सरकार करणार आहे. आम्ही इथं शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच आहोत. अन्नदाता असणाऱ्या बळीराज्याच्या सेवेसाठी आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या भावी पिढीसाठी समृद्ध जीवनाची शाश्वतीही देणार आहोत’, असे म्हटले होते.
दरम्यान, कंगनाच्या या विधानावरून काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे.

ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, आता @KanganaTeam शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणाली. मोदी सरकार व @BJP4Maharashtra च्या नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे. मोदी सरकारने दिलेल्या वाय श्रेणी सुरक्षा व पाठिंब्यामुळे भाजपाची ही झांसी की रानी इतकी शेफारली आहे. आम्ही भाजपा व कंगना या दोघांचा जाहीर निषेध करत आहोत.









