ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील ऑफिसला मुंबई महापालिकेने नोटीस पाठवली आहे. मुंबई महापालिकेने या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, कंगनाचे ऑफिस महापालिकेला देण्यात आलेल्या नकाशाप्रमाणे नसून कंगनाने राहत्या घराचे रूपांतर ऑफिसमध्ये केले आहे.

त्यामुळे बीएमसीचं म्हणणे आहे की, कंगनाने अवैध्यरित्या ऑफिस बांधले असून तिने नियमांचं उल्लंघन केले आहे. त्यामुळे 24 तासांत स्पष्टीकरण आणि ऑफिसचं बांधकाम अधिकृत असल्याचे पुरावे सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. महापालिकेच्या नियम 354 अ अंतर्गत कंगना रनौतला ही नोटीस पाठवली आहे.
मुंबई महापालिकेने या नोटिसमध्ये लिहिले आहे की, कंगना रनौतचे हे ऑफिस मुंबई महानगरपालिकेच्या नियम 354 अ नुसार नाही. तसेच हे अनधिकृत बांधकाम स्वतः काढून टाका नाही तर पालिका हे बांधकाम तोडणार, असेही या नोटीसमधून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, नियम 354 अ च्या मापदंडानुसार, त्या ठिकाणी घर किंवा बिल्डिंगचे बांधकाम करणे अवैध्य ठरवण्यात येते. तरीही बांधकाम केल्यास ते महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते. त्यावेळी बीएमसी त्या बांधकामावर कारवाई करू शकते.









