वाढदिवसा दिवशी रक्षाविसर्जनाची वेळ यामुळे गावात हळहळ
सांगरूळ /वार्ताहर
येथील प्रतीक प्रकाश गुरव (वय १७ )या शालेय विद्यार्थ्याचा औषधाची गोळी खाताना ठसका लागल्यमुळे गोळी श्वासनलिकेत अडकल्याने गुदमरून मृत्यू झाला . ही घटना गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली . ऐन दसऱ्याच्या सणामध्ये प्रतिकची अशी अचानक एक्झिट झाल्याने व त्याच्या वाढदिवसा दिवशी रक्षाविसर्जन करण्याची दुदैवी वेळ त्याचे कुटुंबीय व मित्र परिवार यांचेवर आल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सांगरूळ ( ता .करवीर ) येथील शंकर गोविंद गुरव कुटुंबीय पारंपारिक गुरव व्यवसाया बरोबरच शेती व दुग्ध व्यवसाय करणारे गावातील एक कष्टाळू इतराबरोबर मिळून-मिसळून वागणारे कुटुंब म्हणून ओळखले जाते . प्रतिक हा याच कुटुंबातील प्रकाश शंकर गुरव यांचा एकुलता एक चिरंजीव .सर्वांशी मिळून मिसळून वागण्याच्या स्वभावामुळे त्याचा मित्र परिवार मोठा आहे. प्रतीक नुकताच दहावी पास झाला . असून त्यांने इयत्ता अकरावी सायन्सच्या वर्गात प्रवेश घेतला आहे . चांगले शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत दाखल होण्याचे त्याचे स्वप्न होते.पण नियतीने त्याला अचानक हिरावून घेतल्याने त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहिले .
किरकोळ सर्दी खोकला असल्याने त्यांने गावातील एका खाजगी दवाखान्यात गुरुवारी सकाळी औषध उपचार घेतले . संध्याकाळी जेवणानंतर औषधाची गोळी खात असताना त्याला खोकल्यामुळे जोराचा ठसका लागला .यातच ती गोळी श्वासनलिकेत अडकली .घरच्यांनी तात्काळ त्याला गावातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले .पण प्रतिकची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले .पण उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरनी तपासणी करताच सांगितले . अगोदरच खोकल्याचा त्रास असल्याने व त्यातच गोळी खाताना ठसका लागून ती श्वासनलिकेत आडकल्याने हृदयावर ताण पडून प्रतिकचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले . गुरुवारी रात्री उशिरा त्याच्यावर सांगरुळ येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले . एकुलत्या एका मुलाचे अचानक जाण्याचा धक्का बसल्याने गुरव कुटुंबीय सुन्न झाले आहे . मनमिळावू स्वभावाच्या प्रतिकच्या अशा अकाली जाण्याने गावात ग्रामस्थ व मित्रपरिवारातून हळहळ व्यक्त होत आहे.
वाढदिवसा दिवशी रक्षा विसर्जन
प्रतिकचा रविवार १७ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे . माझे मित्र मंडळ वाढदिवसा दिवशी चेष्टा-मस्करी करतात . तुम्ही त्यांचेवर रागवायचे नाही असे तो आपल्या आईला म्हणत होता .पण तत्पूर्वीच नियतीने घाला घातल्याने मुलाच्या वाढदिवसा दिवशीच त्याची रक्षा भरण्याची वेळ त्याचे कुटुंबीय व मित्र मंडळांवर आली .याची सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .शोकाकुल मित्र परिवाराने गावातील चौकाचौकातून डिजिटल लावून त्याला श्रद्धांजली वाहिली असून ” मित्रा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी रक्षा विसर्जन करून श्रद्धांजली वाहणारे फलक लावण्या इतका नियतीने क्रुर खेळ केला ” हा आशय मन हेलावणारा आहे .









