येत्या पंधरा दिवसात नव्या तरतुदीनुसार किंमत अदा करा : जमीन मालकांचे औद्योगिक मंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी/ संकेश्वर
जागेच्या मालकीचे स्वामीत्व घेतलेल्या राज्य औद्योगिक विकास प्राधिकरणाने युद्धपातळीवर वसाहतीचे काम चालू ठेवले आहे. पण 20 एकर क्षेत्रातील जमीन मालकांनी जोपर्यंत नव्या तरतुदीनुसार जमिनीला किंमत मिळत नाही. तोपर्यंत सरकारने देऊ केलेल्या रक्कमेला आम्ही स्पर्शही करणार नाही. ती किंमत आपल्याला नको, असा पवित्रा घेत शुक्रवारपासून या जमिनीवरील चालू असलेले काम बंद पाडणार, अशी माहिती जमीन मालक ईश्वर माळी व सदाशिव शिरगांवे यांनी दिली.
येथील 20 एकर जमिनीवर आपल्या कित्येक पिढय़ा कसत उदरनिर्वाह करीत आहेत. राष्ट्रीय कामाला विरोध करणे इष्ट नाही, या तत्वांनी राज्य सरकारने आमच्या जमिनी घेतल्या आणि आम्हीही त्या जमिनी देण्याचे आनंदाने कबूल केले होते. यासाठी आपण एक पाऊल मागेही घेतले होते. मात्र सध्या राज्य शासनाने नवी नियमावली ठरविताना किंमत वाढविली आहे. त्यानुसार आपल्या जमिनीला किंमत द्यावी, अन्यथा आमच्या जमिनी आमच्या नावे परत कराव्यात, असे जमीन मालकांनी म्हटले आहे.
गुरुवारी सदर मागणीचे निवेदन मंत्री जगदीश शेट्टर, औद्योगिक मंत्री कर्नाटक सरकार, आमदार उमेश कत्ती, व्यवस्थापक निर्देशक कर्नाटक राज्य औद्योगिक विकास प्राधिकरण बेंगळूर, जिल्हाधिकारी बेळगाव, विशेष जिल्हाधिकारी केआयव्हीडीबी परिषद भवन बेंगळूर, विशेष भू-स्वाधीन अधिकारी-धारवाड इत्यादींना निवेदनाच्या प्रति पाठवण्यात आल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
आद्यौगिक वसाहतीच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे. आर्थिक प्रगतीच्या दिशेने या भागाची कूस वळणार आहे. आपल्या भागात औद्योगिक क्रांतीला होणारी सुरुवात भविष्यात या भागात नंदनवन फुलणार आहे. त्यामुळेच किमान येणाऱया आपल्या पिढीला या जमिनीच्या रकमेवर जगू द्यावे, या रकमेतून उद्योगधंदे उभारुन पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघावा, इतकाच उद्देश या मागणीमधून असल्याची तळमळही त्यांनी यावेळी व्यक्त केली.









