22 रोजी होणार ऑनलाईन सप्तसुरांची बरसात !
औंध / प्रतिनिधी
संगीत रसिकांना आस लागलेला औंध संगीत महोत्सवाचे सूर अखेर जुळले आहेत. 22 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने महोत्सव साजरा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या तीने देण्यात आली. यावर्षी देखील शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत सप्तसुरांची बरसात होणार आहे. यंदा या महोत्सवाचे ८० वे वर्ष आहे.
दरवर्षी अश्विन वद्य पंचमीला शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केला जातो मात्र यंदा कोरोना महामारीमुळे जाणारा औंध संगीत महोत्सव या वर्षी ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय प्रतिष्ठाने घेतला आहे.
ग्रामीण भागात गेली 80 वर्षे हा महोत्सव अव्याहतपणे सुरू आहे. मात्र यंदा महामारीच्या संकटामुळे पहिल्यांदा रसिकांना ऑनलाईन पध्दतीने शास्त्रीय संगीताचा आनंद लुटावा लागणार आहे, ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अनंतबुवा जोशी यांनी अध्यात्मिक गुरू शिवानंद स्वामी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ औंध ता. खटाव येथे १९४० पासून प् उत्सव सुरू केला.
सुरुवातीला छोटेखानी असलेल्या उत्सवाचे स्वरूप हळूहळू वाढत गेले. पं. अंतुबुवा यांचे सुपुत्र प्रख्यात गायक व व्हायोलिन वादक पं. गजाननबुवा जोशी यांनी १९८१ साली ‘शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान’ या संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून हा महोत्सव शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान या संस्थेमार्फत औंध येथे आयोजित केला जातो.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, गिरीजादेवी, उ. सुलतान खा अशा अनेक दिग्गज आणि बुजुर्ग कलाकारांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे. थोर परंपरा लाभलेल्या या महोत्सवात आजही अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलाकार आपली कला दरवर्षी सादर करीत असतात. तसेच नवोदित कलाकार देखील औंध महोत्सवात आपली कला सादर करत असतात.
८० वर्षांची परंपरा लाभलेला हा महोत्सव पूर्णपणे निशुल्क असतो. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागामध्ये आयोजित केला जाणारा हा एकमेव उत्सव आहे. अनेक रसिक श्रोते तसेच अनेक शास्त्रीय संगीताचे विद्यार्थी देखील दरवर्षी न चुकता आवर्जून या संगीतपर्वणीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी औंध येथे हजेरी लावतात.
यंदा करोना महामारीच्या अभूतपूर्व अशा संकटाने पूर्ण जगाला ग्रासले आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका लक्षात घेता यंदा संस्थेने हा उत्सव ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या उत्सवातील सर्व कलाकारांची सादरीकरणे ही ‘औंध संगीत महोत्सवच्या फेसबुक पेजवरुन तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या फेसबुक पेजवरून आणि युट्यूब चॅनेलवरून प्रसारित करण्यात येणार आहे. दोन सत्रात हख महोत्सव होणार आहे.
२२ नोव्हेंबर,२०२० रोजी सकाळी १० वाजता पहिले सत्र सुरू होईल. या सत्राची सुरुवात युवा कलाकार यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलिन वादनाने होईल. त्यांना तबल्यावर साथ करतील विश्वनाथ शिरोडकर करतील. विश्वनाथ जोशी यांचे एकल तबला वादन सादर होईल, त्यांना लेहरासाथ सिद्धेश बिचोलकर करणार आहेत. विश्वेश सरदेशपांडे यांच्या गायनाने पहिल्या सत्राची होईल. त्यांना संवादिनीवर सौमित्र क्षीरसागर आणि तबल्यावर पुष्कर महाजन साथ करतील.
द्वितीय सत्राची सुरुवात संध्याकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सावनी शेंडे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनीवर सुयोग कुंडलकर तर तबला साथ चारुदत्त फडके करणार आहेत. यंदाच्या औंध संगीत महोत्सवाची सांगता हेमंत पेंडसे यांच्या गायनाने होईल. त्यांना संवादिनी साथ सुयोग कुंडलकर आणि तबला साथ प्रणव गुरव करतील.
तरी जास्तीत जास्त श्रोत्यांनी ‘औंध संगीत महोत्सव’च्या फेसबुक पेजवरून तसेच शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्या फेसबुक पेज व युट्युब वरून या संगीत पर्वणीचा आनंद घ्यावा असे आवाहन शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात येत आहे.









