वार्ताहर/ औंध
औंध येथील एका बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडे तोडून अज्ञात चोरटय़ानी घरातील तांब्या पितळेची भांडी, साडय़ा, चांदीच्या वस्तू असा सुमारे 51 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून भरवस्तीतील घरातून वस्तू चोरटय़ांनी लांबवल्याने या घटनेचा छडा औंध पोलिसांनी लावण्याची मागणी ग्रामस्थ व देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे.
याबाबत घटनास्थळ व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील ब्राम्हण गल्लीमध्ये नारायण व्यंकट देशमुख यांचे घर आहे. देशमुख कुटुंबातील सर्व सदस्य नोकरी कामधंद्यानिमित परगावी रहात असल्याने त्यांचे घर हे बंद असते. मात्र त्यांचे शेजारी राहणाऱया महिलेने सातारा येथे राहणाऱया नारायण देशमुख यांना तुमच्या स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या बिजागरी, कडी कोयंडे अज्ञात चोरटय़ांनी तोडल्याचे सांगितले .
याबाबत देशमुख यांनी माहिती मिळताच स्वयंपाक घर व घरातील मागची खोली पाहिली असता चोरटय़ांनी कपाटातील साडय़ा तसेच तांबे, पितळेची भांडी, डबे, पातेली, स्टोव्ह, हंडा, बंब, ताटे, बादल्या, घमेली, फुलपात्रे, चरव्या, कळश्या, चांदीचा करगोटा, टाक, पैंजन अशा वस्तू चोरून नेल्याचे निदर्शनास आले. सुमारे 51 हजार रुपयांच्या या वस्तू चोरटय़ांनी चोरून नेल्या आहेत. त्यानंतर याबाबतची फिर्याद नारायण व्यंकट देशमुख यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.









