वीज वितरणने वीज कनेक्शन तोडल्याने पाणी पुरवठा बंद
औंध / वार्ताहर :
औंंध येथील पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन वीज वितरण कंपनीने तोडल्याने औंध कोरोना सेंटरमधील रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. वीज वितरण कंपनीने ऐन कोरोना काळात त्रस्त जनतेचा अंत पाहु नये, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व रुग्णांच्या नातेवाईकांमधून व्यक्त केल्या जात आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, मागील काही दिवसांपासून औंधसह परिसरातील अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन वीज वितरण कंपनीने तोडले आहे. त्यामुळे औंध येथील कोरोना सेंटरसह औंध गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोरोना सेंटरमध्ये मागील चार ते पाच दिवसांपासून पाण्याची गैरसोय निर्माण झाल्याने रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासह , स्वच्छतेचा, आरोग्याचा प्रश्न ही निर्माण झाला आहे. पाणी नसल्याने कोरोना सेंटरमधील टॉयलेट, बाथरूम परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे.









