प्रतिनिधी /बेळगाव
रसिक रंजन आयोजित ‘ओ दूर के मुसाफीर’ या कार्यक्रमातून अभिनेते दिलीपकुमार यांचे चित्रपटक्षेत्रातील पैलू उलगडण्यात आले. मोजक्मयाच परंतु दमदार चित्रपटांमधून त्यांनी अभिनय करत रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या चित्रपटांमधील गाणी आजही रसिकांच्या जीभेवर आहेत. सदाबहार अशा गाण्यांमुळे हा कार्यक्रम रसिकांची दाद मिळवून गेला.
कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला. प्रारंभी रसिक रंजनचे डी. जी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अनिल चौधरी यांनी दिलीपकुमार यांच्या चित्रपटांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, दिलीपकुमार यांचा जन्म मुस्लीम कुटुंबात झाला असला तरी त्यांच्या आयुष्यात केवळ दोन भूमिका मुस्लीम व्यक्तीरेखेच्या आल्या होत्या. प्रत्येक व्यक्तीरेखेसाठी घेतलेल्या मेहनतीमुळे त्यांचे चित्रपट हीट ठरले. त्यांच्या मुगले आझम या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास घडविल्याचे त्यांनी सांगितले.
ओव्हरहेड प्रोजेक्टरच्या माध्यमातून दिलीपकुमार यांच्या ब्लॅक ऍण्ड व्हाईट चित्रपटांतील गाणी सादर करण्यात आली. त्यापूर्वी एस. पी. उपाध्ये यांनी तयार केलेला दिलीपकुमार यांच्या जीवनावरील लघुपट सादर करण्यात आला. ब्लॅक ऍण्ड व्हाईट ते कलर असा चित्रपटांचा प्रवास यातून उलगडण्यात आला.
एस. पी. उपाध्ये यांना वाहण्यात आली श्रद्धांजली
जुन्या चित्रपट गीतांची एस. पी. उपाध्ये यांना आवड होती. त्यामुळेच त्यांनी अनेक चित्रपटांमधील कलाकारांच्या विविध गीतांचा संग्रह केला होता. दिलीपकुमार यांच्यावर आधारीत ‘ओ दूर के मुसाफीर’ हा कार्यक्रम त्यांनी दिलीपकुमार आजारी असताना तयार केला होता. परंतु त्यानंतर एस. पी. उपाध्ये यांचेच निधन झाल्याने हा कार्यक्रम तसाच राहिला. हा कार्यक्रम रविवारी सादर करण्यात आला. यावेळी एस. पी. उपाध्ये यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.









