प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे कोरोनाने सर्वजण पॅनिक झालेले आहेत. साताऱयात बाधित वाढ होत असल्याने रस्ते निमर्नुष्य होवू लागलेत. या ओस रस्त्याचाच गैरफायदा घेत दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरटय़ांनी राजवाडा ते मंगळवार पेठ रस्त्यावर भरदिवसा दोन महिलांच्या गळय़ातील चेन व मंगळसुत्र हिसकावून नेण्याचा प्रकार घडला. या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली असून सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लंपास केला आहे.
याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास मंजिरी विजय कोल्हटकर (वय 68, रा. मंगळवार पेठ, कोल्हाटकर आळी, सातारा) या त्यांच्या घराकडे चालत निघाल्या होत्या. त्यावेळी समोर दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळय़ातील एक तोळा वजनाची 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला.
तसेच दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरटय़ांनी 5.25 वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठेकडे निघालेल्या कोमल विवेकानंद जगदाळे (रा. यशराज अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा) यांच्या गळय़ातील दीड तोळे वजनाचे 75 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र हिसकावून तेथून पळ काढला. या दोन्ही घटना घडल्या तेव्हा रस्त्याला लॉकडाऊनमुळे वर्दळ कमी होती. नेमका याचा गैरफायदा घेत या चेनस्नेचिंगच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे व सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयांचे फुटेज मिळतेय का ते पाहण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पतंगे करत आहेत.









