प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट हद्दीतील ओल्ड गँट बंगल्यामध्ये झालेल्या अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी समिती स्थापन करण्यास आक्षेप घेण्यात आला. रिझम्प्शन करण्यासाठीच सर्वेक्षण करण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी करून ही कारवाई थांबवावी अशी मागणी केली. संरक्षण खात्याच्या सूचनेनुसार केवळ अतीक्रमणाची माहिती घेण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येणार असून, अतिक्रमण नसल्यास बंगले धारकांना कोणताच धोका नाही असे स्पष्टीकरण देऊन समिती स्थापन करण्यास अध्यक्षांनी मंजुरी दिली.
कॅन्टोन्मेंट बोर्डची सर्वसाधारण सभा ब्रिगेडीअर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी ओल्ड ग्रँट बंगल्यांच्या सर्व्हेक्षणाच्या मुद्यावर जोरदार चर्चा झाली यापूर्वी देखील सर्व्हेक्षण करून बंगले रिझम्प्शन करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे यावेळी देखील बंगल्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येत असल्याने आमदार अनिल बेनके यांच्यासह सदस्यांनी आक्षेप घेतला. विषय पत्रिकेवर सर्व्हेक्षणाबरोबरच रिझम्प्शन असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे बंगले धारकांना हे बंगले सोडण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण करण्यासाठी समिती स्थापन करूनये अशी सूचना करण्यात आली.
पण संरक्षण खात्याने सर्व्हेक्षणाचा अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे. देशात 62 कॅन्टोन्मेंट असून, काही कॅन्टोन्मेंटमधील ओल्ड गँट बंगल्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सर्व कॅन्टोन्मेंटला आदेश बजावून अतिक्रमणाच्या माहितीचा अहवाल मागविला आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील बहुतांश नागरिक नियमांचे पालन करतात. त्यामुळे जर अतिक्रमण झाले नसल्यास घाबरण्याचे कारण नाही. असे स्पष्टीकरण कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष ब्रिगेडियर रोहित चौधरी यांनी केले. तसेच सर्व्हेक्षण करणे आवश्यक असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व सदस्य आणि अधिकाऱयांची समिती स्थापन करण्याची सूचना केली.
तसेच गोगटे चौकातील उद्यानाच्या विकासाबाबतही चर्चा करण्यात आली. उद्यानाच्या ठिकाणी सैनिक स्मारक उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. सदर काम सुरू करण्यास कोणतीच अडचण नसल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे विविध विकास कामावर आणि रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. काही गाळे भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी लावण्यात आलेल्या बोलीला मंजुरी देण्यात आली तसेच विविध विषयांना मंजुरी देण्यात आली.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षा निरंजना अष्टेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीबर्चस्वा, सदस्य डॉ. मदन डोंगरे, अल्लेद्दिन किल्लेदार, साजिद शेख, रिझवान बेपारी, विक्रम पुरोहित, अरेबिया धारवाडकर आदिंसह अधिकारी उपस्थित होते.









