प्रतिनिधी/ मडगाव
कोणत्याही बेकायदा बांधकामाला आपल्या सरकारात थारा नाही तसेच कुणालाही बेकायदा बांधकाम करण्यास दिलेले नाही आणि जर कोणी करत असेल तर त्याला आपण प्रोत्साहन दिलेले नाही. ओल्ड गोव्यातील बांधकामावर कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत काल मडगावात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
ओल्ड गोव्यातील बेकायदा बांधकामांसदर्भात आज अनेकजण बोलतात. पण, प्रत्यक्षात कुणीच लेखी स्वरूपाचा व्यवहार सरकारकडे केलेला नाही. केवळ प्रसार माध्यमांतूनच बातम्या येतात. जर ते बांधकाम बेकायदेशीर असले तर ते पाडण्यासाठी लेखीस्वरूपात मागणी करावी आणि जर ते खरेच बेकायदेशीर असेल तर ते पाडले जाईल. आपल्याला त्याच्याशी काही देणेघेणे नाही.
या बांधकामासंदर्भात आपल्याला जी माहिती उपलब्ध झालेली आहे, त्या प्रमाणे एक खासगी प्लॉट एका राजकीय पक्षाच्या व्यक्तीने, जो एकेकाळी मंत्री होता, त्या मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने विकत घेतला होता. आज तो माजी मंत्री या प्रकरणी हातवर करीत आहे. आपल्याला या प्रकरणात खोलात जायचे नाही. या बांधकामांसाठी कुणी तरी नंबर घेतलेला आहे आणि कुणी तरी परवाना दिलेला आहे. त्या मागे माजी मंत्र्याचा हात होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ज्याने बांधकाम केलेय त्याने बांधकामासाठी लागणारा परवाना घेतलेला होता आणि बांधकाम सुरू केले होते. आज या बांधकामावर आंदोलन सुरू झालेले आहे. त्यामुळे सरकार या संदर्भात कृती करणार आहे. आपण स्वतः नगरनियोजन व पंचायत खाते यांना बांधकामांसंदर्भातील सर्व कागदपत्रे तपासण्यास सांगितली असून जर ती कायदेशीर नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘पाप’ आपल्या माथी नकोच
ज्यांनी या बांधकामासंदर्भात ‘पाप’ केले आहे. तेच आज बोलत आहे. या बांधकामाचे पाप आपल्या माथी मारू नये असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. जे कोण बोलतात त्या व्यक्तीचे फोटो व व्हिडिओ बांधकाम करणाऱया व्यक्तीसोबतच आहे आणि त्यांचे संबंधही आहेत. आपला या बांधकामांशी कोणताच संबंध नाही व आपल्या पक्षाचा देखील संबंध नाही. आत्ता जो काही विषय आहे त्यावर कायदेशीर मार्गाने कृती केली जाईल, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
15 डिसेंबरपर्यंत आगशीतील वाहतूक समस्या हलकी होणार
सध्या आगशी-कुठ्ठाळी येथील वाहतूक समस्या ही सर्वांसाठी डोकेदुखी बनली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची प्रचंड मोठी कोंडी होत असते. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 15 डिसेंबरपर्यंत यात सुधारणा होईल. या भागातील तीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले केल्यानंतर ही समस्या काही प्रमाणात सुटणार आहे आणि संपूर्ण समस्या सुटण्यासाठी आणखीत थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.