प्रतिनिधी /तिसवाडी
zदोन दिवसांपासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे ओल्ड गोवा परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी भरल्याने वाहतुकीस बराच त्रास झाला. त्याचबरोबर काहींच्या घरांमध्ये, हॉटेलमध्ये, गाडय़ांमध्ये पाणी गेल्याने अनेकांना नुकसानी झाली.
गांधी सर्कल, हातकातरो खांब, मळार परिसरात भरपूर पाणी साचले होते. नव्याने बांधण्यात आलेल्या सहापदरी महामार्गाच्या सर्विस रोडवरही मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्याने वाहनांना बराच त्रास झाला. दुचाकी बंद पडल्या. कारगाडय़ांमध्येही पाणी शिरल्याचे काहींनी सांगितले.
मळार येथे पणजी-फोंडा मार्गाच्या बाजूची गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यांरुन वाहत होते. एवढेच नव्हे तर तेथील सत्यम हॉटेलमध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी शिरल्याने त्यांची नुकसानी झाली. हॉटेलचे मालक रामा (बाप्पा) खांडेपारकर यांनी सांगितले की गटार तुंबत असल्याने त्यांच्या हॉटेलात पाणी जाते. पंचायतीने याकडे लक्ष देऊन ते गटर व्यवस्थित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
गेटीर या बसस्टॉपजवळ असलेल्या पुंडलिक सावंत यांच्या छोटय़ाशा गाडय़ातही पाणी शिरल्याने त्यांनाही नुकसान झाले.
करमळी येथील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले. करमळीच्या तळय़ातही पाणी तुडुंब भरल्याने करमळी ते पेठेर रस्त्यावरुन पाणी वाहत होते.









