वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत ससेक्स संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला इंग्लंडकडून कसोटी पदार्पणाची संधी उपलब्ध झाली आहे. 2 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघामध्ये ओली रॉबिन्सनचा समावेश करण्यात आला आहे.
गेल्यावर्षीच्या उन्हाळी मोसमामध्ये झालेल्या इंग्लंडच्या मालिकासाठी रॉबिन्सनचा संघात समावेश करण्यात आला होता. तसेच इंग्लंडच्या लंका आणि भारताच्या हिवाळी मोसमातील दौऱयांसाठी रॉबिन्सनला राखीव खेळाडू म्हणून निवडले होते. आता 2 जूनपासून सुरू होणाऱया न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिकेत रॉबिन्सनला आपले कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंड संघाकडून कसोटी पदार्पण करण्याचे रॉबिन्सनचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे.
कौंटी क्रिकेट स्पर्धेच्या गेल्या चार हंगामामध्ये 27 वर्षीय रॉबिन्सनची कामगिरी समाधानकारक झाली असून त्याने 2018 ते 2020 या कालावधीत इंग्लीश कौंटी क्रिकेट स्पर्धेत 17.59 धावांच्या सरासरीने 159 बळी मिळविले आहेत. चालू वर्षीच्या इंग्लिश कौंटी हंगामात त्याने 14.72 धावांच्या सरासरीने 29 बळी बाद केले आहेत. ससेक्स संघाकडून खेळताना त्याने ग्लॅमर्गन संघाचे एका डावात 78 धावात 9 बळी घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.









