पदावरून हटविण्याचा कट रचल्याचा केला आरोप
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे सत्तास्थान धोक्यात आले आहे. सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षात सुरू असलेला संघर्ष आणि देशात सरकारच्या विरोधात असलेल्या संतापावरून लक्ष विचलित करण्यासाठी पंतप्रधान ओली आता उग्र राष्ट्रवादाचा प्रयोग करू पाहत आहेत. एक दूतावास माझ्या सरकारच्या विरोधात हॉटेलमध्ये कट रचत असल्याचे म्हणत ओली यांनी अप्रत्यक्षपणे भारतावरच आरोप केला आहे.
मला पदावरून हटविण्याचा खेळ सुरू झाला असला तरीही ते अशक्य असल्याचे विधान ओली यांनी मदन भंडारी यांच्या 69 व्या जयंतीनिमित्त बोलताना केले आहे. काठमांडूच्या एका हॉटेलात मला हटविण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत आणि यात एक दूतावासही सक्रीय असल्याचे म्हणत ओली यांनी भारताला लक्ष्य केले आहे.
राष्ट्रीयत्व कमकुवत नाही
भारतीय भूमीला नेपाळच्या नकाशात दर्शविण्यात आल्यापासून माझ्याविरोधात कट रचले जात आहेत. मला पदावरून हटविण्यासाठी उघड शर्यत सुरू झाली आहे. परंतु नेपाळचे राष्ट्रीयत्व कमकुवत नाही. नकाशा प्रसिद्ध केल्याने कुणाला पंतप्रधानपदावरून हटविण्यात येईल असा विचारही कुणी नव्हता असा कांगावा ओली यांनी चालविला आहे.
पक्षात ‘प्रचंड वादळ’
पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा पक्ष आता फुटीच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे. नेपाळच्या सत्तारुढ कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी पंतप्रधान ओली यांच्यावर टीकेची झोड उठवत राजीनाम्याची मागणी केली आहे. पंतप्रधानांनी राजीनामा न दिल्यास पक्षात फूट पाडू असा इशाराच प्रचंड यांनी दिला आहे.
सैन्याला राजकारणात ओढले
पंतप्रधान ओली स्वतःचे पद वाचविण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. ओली हे पंतप्रधानपदासाठी नेपाळच्या सैन्याला राजकारणात ओढत आहेत. सत्तेवर कायम राहण्यासाठी ओली हे पाकिस्तानी, अफगाणी किंवा बांगलादेशी प्रारुप अवलंबिण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशाप्रकारचे प्रयत्न नेपाळमध्ये यशस्वी होणार नसल्याचे प्रचंड यांनी सुनावले आहे.
राजीनाम्याच्या मागणीला जोर
कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत बहुतांश सदस्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर ओली यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ चालविली आहे. ओली आणि प्रचंड या दोन्ही नेत्यांनी बैठकीत परस्परांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. प्रचंड यांनी सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे. तर प्रचंड यांच्यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याचा दावा ओली यांनी केला आहे.









