नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लोकांना टॅक्सी सेवा पुरविणाऱया ओला, उबेर, जुगनू आणि मेरु आदी कंपन्यांना केंद्र सरकारने निर्वाणीचा इशारा दिला आहे. या कंपन्यांच्या सेवांसंबंधी ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. त्याच प्रमाणे या कंपन्यांचे कर्मचारी आणि टॅक्सी चालक यांच्याही तक्रारी आहेत. या तक्रारींची त्वरित दखल घेऊन निवारण करावे. अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण विभागाने या कंपन्यांना हा इशारा दिला आहे. या कंपन्यांचे कामकाज कसे चालते, सेवा देण्याची प्रक्रिया काय आहे, किती दर ग्राहकांकडून आकारला जातो, चालक आणि इतर कर्मचाऱयांच्या वेतनाचे निकष कोणते आहेत इत्यादी माहिती त्वरित केंद सरकारला सादर करण्याचा आदेश या कंपन्यांना देण्यात आला आहे. या कंपन्या ग्राहकांकडून वाजवीपेक्षा जास्त दर आकारुन कर्मचाऱयांना वेतन मात्र असमाधानकारक दिले जाते. याशिवाय ग्राहकांना योग्य ती सेवा दिली जात नाही. कंपन्या आपले उखळ पांढरे करुन घेण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी तक्रार अनेक ग्राहक आणि कर्मचाऱयांनी केली आहे.
या कंपन्यांनी सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे, असे त्यांना स्पष्ट करण्यात आले आहे. ग्राहक कल्याण विभागाने या कंपन्यांच्या अधिकाऱयांशी एक बैठकही आयोजित केली होती. या बैठकीत सरकारने मिळविलेली माहिती कंपन्यांसमोर ठेवण्यात आली.









