सुमारे 300 रोपे जळाली : दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान
वार्ताहर / जांबोटी
ओलमणी येथे मंगळवारी दुपारी काजू बागेला आग लागून सुमारे 300 झाडे आगीच्या भक्षस्थानी पडल्यामुळे सुमारे दोन लाख रु. चे आर्थिक नुकसान झाले आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, ओलमणी येथील केदारी खंडोबा राऊत, नामदेव खंडोबा राऊत यांची गावापासून 1 कि. मी. अंतरावर शेती आहे. त्या ठिकाणी त्यांनी दोन वर्षांपूर्वी वेंगुर्ला फोर बी या जातीच्या सुमारे 300 काजू रोपांची लागवड केली आहे. सध्या सदर काजू रोपे फळधारणेला आली होती. त्यांनी अद्याप काजू रोपांची साफसफाई केली नसल्यामुळे काजू बागेत काजू ठिकाणी गवत शिल्लक होते. मंगळवारी दुपारी अचानक राऊत बंधूच्या काजू बागेला आग लागल्यामुळे सुमारे 300 काजू रोपे आगीच्या भक्षस्थानी पडली. आग लागल्यानंतर केवळ अर्ध्या तासात त्यांनी काजू बागेकडे धाव घेतली. तोपर्यंत सर्वच काजू रोपे होरपळून गेली होती. या घटनेमुळे त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. तरी महसूल खात्याच्या अधिकारी वर्गानी पाहणी करून आर्थिक नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणी होत आहे.









