गावात 13 पॉजिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे निर्णय : 31 मेपर्यंत गावात प्रवेशबंदी : ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
वार्ताहर / जांबोटी
ओलमणी (ता. खानापूर) येथे दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे जांबोटी ग्राम पंचायतीने या गावाला कंटेन्मेंट झोन घोषित केल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. गावातील मुख्य रस्ते बंद करून प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
सुमारे 2500 लोकसंख्या असलेल्या ओलमणी गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी कोरोना सदृश लक्षणे आढळून येत होती. सदर आजारांवर स्थानिक डॉक्टरांकडूनच उपचार सुरू होते. मात्र त्याचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. त्यातच गावातील दोन व्यक्तींचा उपचार सुरू असताना बेळगावच्या खासगी रुग्णालयात बळी गेल्याने ते कोरोनामुळेच दगावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने काही नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल सोमवारी प्राप्त झाल्यानंतर 13 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे गावात एकच खळबळ माजली. तसेच ओलमणी गावची नोंद कोरोना हॉटस्पॉट म्हणून झाली.
सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन
13 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य खात्याचे डीएसओ डॉ. बी. एन. तुक्कार यांनी ओलमणीला तातडीने भेट देऊन पाहणी करून हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश जांबोटी ग्रा. पं. ला दिले. त्यानंतर जांबोटी ग्रा. पं. अध्यक्ष महेश गुरव, पीडीओ उदयकुमार शिवापुरे, कार्यदर्शी नारायण पाटील, पोलीस हवालदार बसवराज कोणन्नावर, ग्रा. पं. सदस्य सूर्यकांत साबळे, अशोक सुतार, प्रविणा साबळे आदींनी गावाला भेट देऊन पाहणी केली व गावाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून गावातील मुख्य रस्ते बंद करून 31 मे पर्यंत गावात प्रवेशबंदी केली आहे. तसेच ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून गावातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच किराणा दुकान, दूध डेअरी व इतर व्यवहार 31 मेपर्यंत बंदच ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान कणकुंबी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्याधिकारी डॉ. चेतन व त्यांच्या सहकाऱयांनी गावातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या घरी भेट देऊन त्यांना होमआयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देऊन औषधोपचार सुरू केले आहेत. ओलमणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.