ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट घातक नसला तरी देखील तो डेल्टापेक्षा तीन पट जास्त संक्रमणकारक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर निर्माण होणारा ताण दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही. त्यामुळे संपूर्ण जग चिंतेत आहे. ओमिक्रॉनवर नियंत्रण मिळविण्यासाठी अनेक देशात बुस्टर डोस देण्यात येत आहेत. तसेच फायझर या लस निर्माती कंपनीकडून ओमिक्रॉनचा सामना करु शकेल, अशी लस बणविण्यावर काम सुरू आहे. येत्या मार्चपर्यंत ही लस तयार होईल, असे फायझरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले.
अल्बर्ट बौर्ला म्हणाले, जगभरात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना लसीचे दोन डोस आणि एका बुस्टर डोसद्वारे नागरिकांना कोरोनापासून होणाऱ्या संभाव्य धोक्यांविरुद्ध संरक्षण मिळत आहे. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंटला थेट लक्ष्य करणाऱ्या लसनिर्मितीवर काम सुरू आहे. फायझर मार्चपर्यंत अशी लस तयार करेल. मात्र, भविष्यात या लसीची तेव्हा गरज भासेल की नाही, तसेच ही लस कशी वापरली जाईल, हे सांगता येणार नाही.