विवाह समारंभामध्ये उपस्थिती मर्यादा 500 – मॉल, चित्रपटगृहांमध्ये प्रवेशासाठी दोन डोस सक्तीचे
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली असून राज्य सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव नवी मार्गसूची जारी केली आहे. मॉल, चित्रपटगृहांमध्ये लसीच्या दोन डोसची सक्ती, विवाह समारंभांमध्ये कमाल 500 जणांच्या उपस्थितीला परवानगी, मास्क वापरण्याची सक्ती, असे अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. याशिवाय कोरोना चाचण्यांमध्ये वाढ, विमानतळांवर अधिक उपाययोजना, आरोग्य यंत्रणेला सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत.
बेंगळूरमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून आल्याने मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी कोविड तांत्रिक सल्लागार समितीतील सदस्य, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत महसूलमंत्री आर. अशोक यांनी मार्गसूचीविषयी माहिती दिली.
जगभरात ओमिक्रॉन व्हेरियंटचे 400 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्येही कोरोनाच्या प्रकरणाची नोंद होत आहे. त्यामुळे पालकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असतील तरच त्यांना आपल्या मुलांना शाळेपर्यंत सोडण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. 15 जानेवारी 2022 पर्यंत शाळा-महाविद्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम, समारंभांचे आयोजन करू नयेत. शिवाय लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच मॉल, चित्रपटगृहे या ठिकाणी प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे. विवाह समारंभ, सभा-समारंभांमध्ये कमाल 500 जणांच्या उपस्थितीला मुभा देण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱयांना लसीचे दोन डोस सक्तीचे करण्यात आले आहेत. केरळ, महाराष्ट्रातून येणाऱयांमुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता या दोन्ही राज्यांच्या सीमेवर त्या राज्यातून येणाऱया प्रवाशांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.
विमानतळांवर चाचणीसाठी दर निश्चित
विमानतळांवर विदेशातून येणाऱया सर्व प्रवाशांना कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. सामान्य दर 500 रुपये आणि तातडीची चाचणी करण्यासाठी 3 हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रवासी यापैकी कोणत्याही पर्यायाचा स्विकार करू शकतील. मात्र, त्यांचा चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला तरच त्यांना बाहेर पाठविण्यात येईल. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांना इस्पितळात दाखल केले जाणार आहे, अशी माहिती मंत्री आर. अशोक यांनी दिली.
आरोग्य यंत्रणेला सज्जतेच्या सूचना
मुख्यमंत्री बोम्माई यांनी आरोग्य अधिकाऱयांचीही बैठक घेत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोना नियंत्रणासाठी सर्व खात्यांच्या प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांना कोरोनाच्या मागील लाटेवेळी केलेल्याप्रमाणेच तयारी करण्याची सूचना केली. आयसीयु घटक, इस्पितळांमध्ये पुरेशा प्रमाणात बेड्सची व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा सज्ज ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
चाचण्या लाखापर्यंत वाढविण्याची सूचना
राज्यात दररोज सरासरी 60 हजार कोविड चाचण्या केल्या जात आहेत. हे प्रमाण प्रतिदिन 1 लाखापर्यंत वाढविण्याची सूचना आरोग्य खात्याला करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना विनाअडथळा ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी सज्जता आणि ऑक्सिजन वाहतुकीची व्यवस्था करण्याची सूचना आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांना देण्यात आली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने बेंगळूरसह राज्यभरात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याची जबाबदारी वरिष्ठ आयएएस अधिकारी शिल्पा नागराज यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मास्क न वापरल्यास दंड
कोरोना नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी मार्गसूची लागू केली आहे. त्यानुसार मास्क वापरणे, गर्दीवर नियंत्रण, लसीकरण, कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. मास्क न वापरणाऱयांवर पुन्हा दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेंगळूर महापालिका कार्यक्षेत्रात मास्क न वापरणाऱयांवर 250 रुपये आणि राज्यातील इतर शहरी भागांमध्ये 100 रुपये दंड आकारण्याची सूचना देण्यात आली आहे.
अधिवेशन बेळगावातच…
येत्या 13 डिसेंबरपासून बेळगावमध्ये राज्य विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्याने अधिवेशन रद्द करावे किंवा लांबणीवर टाकावे, असा सल्ला राज्य सरकारला देण्यात आला होता. मात्र, कोरोना मार्गसूचीचे पालन करून बेळगावमधील सुवर्ण विधानसौधमध्ये अधिवेशन भरविण्यास शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी आयोजिलेल्या बैठकीत संमती दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावमध्ये होणारे अधिवेशन रद्द होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, यासंबंधी स्वतंत्रपणे मार्गसूची जारी केली जाणार आहे. शिवाय नववर्ष साजरे करण्यासंबंधी पुढील दिवसांत परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.
महत्त्वाचे...
@ मॉल, चित्रपटगृहांमध्ये लसीचे दोन डोस सक्तीचे
@ विवाह, सभा-समारंभांमध्ये 500 जणांपेक्षा कमी उपस्थिती
@ 18 वर्षांखालील मुलांना शाळेत सोडणाऱया पालकांना दोन डोस सक्तीचे
@ आरोग्य कर्मचारी, 65 वर्षांवरील नागरिकांची कोविड चाचणी
@ सरकारी कर्मचाऱयांना लसीचे दोन डोस घेणे सक्तीचे
@ मास्क न वापरणाऱयांना 100 रुपये दंड
@ केरळ-महाराष्ट्रातून येणाऱया प्रत्येकाची सक्तीने कोविड तपासणी
@ 15 जानेवारीपर्यंत शाळा-महाविद्यालयांत कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध









