जेरुसलेम
कोरोनासंबंधीत नवा व्हेरियंट ओमिक्रॉन विषाणूच्या वाढत्या चिंतेची दखल घेऊन इस्रायलने लस न घेतलेल्यांवर दहा दिवसांसाठी प्रवासावर कडक निर्बंध लादण्याचा विचार चालवला आहे. यासोबत क्वारंटाइनचा नियमही आत्मसात केला जाणार असल्याची माहिती इस्रायल सरकारकडून देण्यात आली आहे. याअंतर्गत इस्रायलमध्ये दाखल होणाऱया सर्व विदेशी नागरिकांवर 19 दिवसांची बंदी घातली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलमध्ये सर्वाधिक कोरोनाचे नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले असल्याची बाब समोर आली आहे. देशामध्ये आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 21 रुग्ण आढळून आले आहेत. इस्रायल सरकारने ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांना 10 दिवसांसाठी क्वारंटाईनचा नियम लागू केला होता, तो आता चौदा दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांनी लस घेतलेली नाही अशांवर लॉकडाऊन लागू करण्याचा विचारही सरकारने चालवला असल्याचे समजते. त्याचप्रमाणे लस न घेतलेल्यांवर विदेशात जाण्यासही बंदी लादली जाणार आहे.









