मस्कत :
अरब क्षेत्रात सर्वाधिक काळ राज्य करणारे नेते ओमानचे राजे काबूस यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले आहे. राजघराण्याने शनिवारी यासंबंधी माहिती दिली आहे. ओमानच्या राजांनी शुक्रवारी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काबूस यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
ओमानच्या राजांना कर्करोगाची लागण झाल्याचे मानले जात होते. काबूस यांनी स्वतःचा वारस घोषित केलेला नाही. काबूस हे अविवाहित हेते आणि त्यांना भाऊ देखील नाही. ओमानच्या राज्यघटनेनुसार सिंहासन रिक्त झाल्याच्या 3 दिवसांच्या आत राजघराण्याला उत्तराधिकारी घोषित करणे अनिवार्य आहे.
महाराज काबूस बिन सईद अल सईद यांच्या निधनाच्या वृत्ताने मोठे दुःख झाले आहे. सईद अल सईद हे द्रष्टे नेते होते आणि त्यांनी ओमानला एक आधुनिक आणि समृद्ध देशाचा दर्जा प्राप्त करून दिला होता. काबूस हे भारताचे खरे मित्र होते आणि त्यांनी भारत-ओमानमधील भागीदारी बळकट करण्यात सशक्त भूमकि बजावल्याचे मोदींनी म्हटले आहे.









