- ज्ञानदेवांची गणेश वंदना प्रवचनमाला प्रारंभ
ऑनलाईन टीम / पुणे :
सगळ्या देवतांना स्वरुप आहे. रुपाचा संबंध नेहमी चेह-याशी लावला जातो. परंतु मोरया अरूप आहे. त्याचा चेहरा अद्वितीय आहे. तो गजस्वरुप आहे. त्याचे रुप विलक्षण आहे. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, देवा तूची गणेशु. गणेश तत्त्वाच्या चिंतनातून माऊलींना ओमकार तत्त्वाचे चिंतन अपेक्षित आहे. ओमकारब्रह्म हेच मोरयाचे स्वरूप माऊली आपल्याला सांगतात, असे निरुपण प.पू.गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद गजानन पुंड महाराज यांनी केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवानिमित्त मोरयाच्या विलक्षण वैभवाची गाथा असलेल्या श्री ज्ञानदेवांची गणेश वंदना या निरुपण मालिकेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. ज्ञानदेवांनी परब्रह्म परमात्मा श्री गणेशाचे रुप कसे आहे, हे या निरुपण मालिकेतून सांगण्यात येत आहे.

प.पू.स्वानंद पुंड महाराज म्हणाले, एका बाजूला शैव सांप्रदाय आहे. दुस-या बाजूला वैष्णव सांप्रदाय आहे. त्यांच्या समन्वयाच्या पातळीवर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला उपदेश करत आहेत. माउलींनी उपदेशाच्या आरंभी मात्र संपूर्ण गणेशवंदना वापरली आहे. ही मजेदार रचना आहे. यामध्ये कुठेही शिवपुत्रत्वाचा उल्लेख अथवा पार्वती पुत्राचा अथवा शिवगण प्रमुखाचा उल्लेख नाही. उलट माऊलींनी मांडलेली भूमिका ही गाणपत्य संप्रदायाची भूमिका आहे. ओमकार ब्रम्हस्वरुप असलेल्या भगवान गणेशाला ते अभिवादन करत आहेत.
ते पुढे म्हणाले, संत ज्ञानेश्वर माऊलींनी परब्रह्म परमात्मा स्वरूप असणा-या मोरयाला शब्दब्रह्माच्या स्वरूपामध्ये मूर्त स्वरूप कसे आणले, हे निरुपण मालिकेतून समजून घेता येणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी परब्रह्म परमात्मा गणेशाचे रूप कसे आहे, याबाबतचे जे विचार मांडले आहेत. ते जाणून घेता येणार आहेत.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, दिनांक १९ सप्टेंबर पर्यंत दररोज सकाळी ८ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या यू टयूब चॅनलवरुन ही निरुपण मालिका अनुभविता येणार आहे. श्री ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिकेच्या आरंभी व इतर ठिकाणी मोरयाला केलेले वंदन या निरुपण मालिकेतून भाविकांना ऐकायला मिळणार आहे. भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे.








