प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव-अनगोळ संपर्क रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. या अंतर्गत ओमकारनगर, वडगाव येथील नाल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. नाल्याचे बांधकाम सुरू करून महिना होत आला. पण हे काम संथगतीने सुरू असल्याने बांधकाम रखडले आहे. येथील नाल्याचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
अनगोळ-वडगाव रस्त्यावर असलेल्या नाल्यावर अतिक्रमण झाले असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच नाल्याचे बांधकाम झाले नसल्याने सांडपाणी विहिरीमध्ये पाझरून पाणी दूषित झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नाल्याचे बांधकाम करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. मात्र सध्या रस्त्याच्या रुंदीकरणासोबत नाल्याचे बांधकाम करण्यात येत आहे. हे काम सुरू करून महिना होत आला. पण अद्यापही काम सुरळीतपणे सुरू नाही. हे काम बंद असल्याने नागरिकांना ओमकारनगरमधील रस्त्याने ये-जा करावी लागत आहे. नाल्याच्या बांधकामासाठी सांडपाणी अडविण्यात आले आहे. परिणामी सांडपाणी साचून ओमकारनगरमधील विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. सध्या पाणीपुरवठा मंडळाकडून सुरळीत पाणीपुरवठा केला जात नाही. अशातच विहिरींचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथील नाल्याचे बांधकाम तातडीने हाती घेऊन पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.









