सांगली /प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकार विरोधात भाजपाच्या वतीने आज (२३ मे ) सांगली येथे आंदोलन करण्यात आले आहे. भाजपा आमदारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करत सर्वोच्च न्यायालयात तातडीने ओबीसी आरक्षणासाठी लागणारा इंमपेरिकल डाटा सादर करण्याची मागणी करण्यात यावेळी करण्यात आली आहे.
भाजपाचे सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, मिरजेचे भाजपा आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी आघाडी सरकार विरोधात धरणे आंदोलन करत जोरदार निदर्शने केली आहेत.राज्यातील निवडणूकांपूर्वी ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी तातडीने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये इंमपेरिकल डाटा सादर करून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करत पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी भाजप आमदारांनी दिला.








