मुंबई/प्रतिनिधी
OBC आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत सर्वपक्षीय बैठक आज सह्याद्री अतिथिगृहात पार पडली. आता यासंदर्भात पुढील शुक्रवारी पुन्हा बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. परंतु आज झालेल्या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वपक्षीयांचे एकमत झालं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, या विषयावर सगळ्याच पक्षांचे एकमत आहे. यासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना, विविध पर्यांयाचा अभ्यास करून येत्या शुक्रवारी यावर सर्वानुमते निर्णयाप्रत येण्यासाठी बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
आज पार पडलेल्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे, यावर सर्वपक्षांचे एकमत आहे. राजकीय आरक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत सर्वांनी केलेल्या सूचनांचे स्वागत आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी विविध राजकीय पक्षांची मते आजच्या बैठकीत समजून घेतली. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ नयेत ही सर्वांचीच भावना असल्याचे ते म्हणाले. दरम्यान आजच्या बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना आणि पर्यायांचा येत्या काही दिवसात अभ्यास करून येत्या शुक्रवारी यासंबंधाने सर्व सहमतीने निर्णय घेऊ असे ते म्हणाले.