नवी दिल्ली / वृत्तसंस्था
जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केल्यामुळे दर वाढल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या देशाच्या अनेक भागात पेट्रोलचे दर 100 रुपये प्रतिलिटरच्या आसपास येऊन पोहोचले आहेत. काही भागात या दरांनी शंभरीही पार केली आहे.
कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे तेल उत्पादक देशांनी म्हणजेच ‘ओपेक’ने कच्च्या तेलाच्या उत्पादन पद्धतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाच्या नेतृत्वात तेल उत्पादनासंदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत तेल उत्पादक देशांनी तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता. ही उत्पादनकपात एप्रिलपर्यंत कायम राहणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने साहजिकच या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या किंमती वाढायला सुरुवात झाली आहे. भारत कच्च्या तेलाचा मोठा आयातदार देश असल्याने या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय जनतेला बसत आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱया देशांमध्ये संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतार, नायजेरिया, कुवैत, लिबिया, गबॉन, इराण, काँगो, व्हेनेझुएला, इराक, इक्वेडॉर, अल्जेरिया या देशांचा समावेश आहे. यासोबतच रशियामधूनही काही प्रमाणात कच्च्या तेलाचा पुरवठा केला जातो.









