सोमवारपर्यंत फोंडा, तिसवाडी मर्यादित पाणीपुरवठा
प्रतिनिधी / पणजी
खांडेपार नदीला पूर आल्यामुळे ओपा पाणी प्रकल्पातील पाणी खेचणारी यंत्रणा (पंप स्टेशन) निकामी झाली असून त्याचा परिणाम फोंडा तिसवाडी तालुक्यातील पाणी पुरवठय़ावर झाला आहे. दोन्ही तालुक्यात 24 ते 26 जुलै असे तीन दिवस मर्यादित स्वरुपात पाणी पुरवठा होणार असल्याचे बांधकाम खात्याने कळवले आहे.
दरम्यान राजधानी पणजीतील पाणीपुरवठा ठप्प झाल्याच्या अनेक तक्रारी येत असून त्यामुळे पणजीतील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होणार असल्याची चिन्हे आहेत.
तिसवाडीतील सुरक्षा आस्थापने, औद्योगिक आस्थापने तसेच वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळांना देखील पाणी पुरवठा मर्यादित स्वरुपात होणार असल्याचे खात्याने म्हटले आहे. राजधानी पणजीत अनेक ठिकाणी काल सायंकाळी नळांना पाणी आलेच नाही. बाहेर धो धो पाऊस आणि घरातील नळाला थेंबही नाही, असे चित्र दिसू लागले आहे. पाणी नसल्याने अनेक रहिवाशांनी पाण्यासाठी आटापिटा सुरू केला असून मर्यादित स्वरुपात पाणी येणार असे खात्याने कळवले असले तरी पाणी येणार नसल्याचीच चिन्हे दिसत आहेत. पाणी मिळेल की नाही याची विचारणा खात्याकडे कालपासूनच सुरू झाली आहे.









