रुरकेला स्टील प्रकल्पात दुर्घटना
रुरकेला : देशात एका मागोमाग एक विषारी वायू गळतीची प्रकरणे वाढतच चालली आहेत. उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथील इंडियन फार्मर्स फर्टिलायजर को-ऑपरेटिव्ह लिमिटेडमध्ये अमोनिया वायूच्या गळतीनंतर आता ओडिशाच्या रुरकेला स्टील प्रकल्पात वायूगळती झाली आहे. रुरकेला स्टील प्रकल्पातील एका युनिटमध्ये विषारी वायूची गळती झाल्याने आतापर्यंत 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 6 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. वायूगळतीमागील कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही. विषारी कार्बन मोनोऑक्साईड वायूच्या गळतीनंतर स्टील प्रकल्पाच्या कोल केमिकल विभागात दुरुस्तीचे काम करणाऱया 4 मजुरांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱयांनी दिली आहे. प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चतराराज यांनी मृत मजुरांच्या कुटुंबीयांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.